हुनर खोज संवाद यात्रा -आसाम.

# *हुनर खोज संवाद यात्रा*
# *आसाम*
# _दिवस पहिला:20 नोव्हेंबर_

  
 "जिथे मिळे धरेला,
   आभाळ वाकलेले
   अस्ताचलास जिथे
     रविबिंब टेकलेले
   जिथे खुळ्या ढगांनी
    रंगीन साज ल्यावा."
        ज आसाम राज्यातील गुवाहाटी या शहरातून सायंकाळचा मावळणारा सूर्य पाहिला.अन कवियत्री शांता शेळके यांच्या 'ही वाट दूर जाते' या कवितेतील पंक्ती ओठावर  आपसूक आल्या.
     
      काल जेव्हा रेल्वेने नॉर्थ इस्ट राज्यात प्रवेश केला असेल तेव्हा आम्ही झोपेत होतो. जेव्हा पहाटे जाग आली तेव्हा 5:30 वाजलेल्या.पण आपल्याकडे यावेळी तांबडं फुटू लागलेलं असतं. इथं मात्र चक्क उजाडलेलं होतं. कारणही तसंच आहे,जगात जपान जसा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो तसे हे राज्ये आपल्या भारताचे उगवते चेहरे आहेत.
 
  खूप तासांचा प्रवास करूनही येथील रेल्वेच्या खिडकीतून डोंगरा-डोंगरामधून दिसणारे विविध जातीचे वृक्ष, सकाळी सकाळी खेड्यातील लोकांची शेतात जाण्याची चाललेली लगबग, कोणाच्या शेतातील भात पीक कापलेले, काहीजण कापत आहे.ब्रम्हपुत्रा नदीचे दिसणारे भलेमोठे पात्र ही सारी दृश्ये थकवा घालवून उत्तेजित करत होते.
   ‎     
   ‎      आज मात्र आम्ही स्थानिक मार्गदर्शक,आदिवासी समाजाचा अभ्यास असणाऱ्या विचारवंताशी चर्चा करून उद्यापासून कोणत्या ठिकाणी, कोणत्या भागात जायाचे याचे नियोजन केले.
     
     ‎आमचा सध्या मुक्काम विवेकानंद आश्रम मध्ये आहे. त्यामुळे त्यांचा एक संदेश सतत आम्हाला जागे करत राहतो."उठा ,जागे व्हा,ध्येयसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका."
         
             आसाम राज्याची आसमिया ही राज्यभाषा असली तरी बऱ्यापैकी हिंदी येणारे भरपूर लोक आहेत, त्यामुळे संवादाची अडचण येत नाही.मात्र शाकाहारी व महाराष्ट्रीयन जेवणाची सवय असणाऱ्यासाठी जरा अडचण आहे. येथील प्रमुख अन्न भात व मासे आहेत.आपल्या राज्याच्या पोलिसांकडे रात्रीसुद्धा शस्त्र म्हणून काठी असते.पण इथं जरा धोका असल्याने दिवसासुद्धा राज्यपोलीस रायफल घेऊन उभे असलेले दिसतील.
      
        ‎दिवसभरात आम्ही एका मोठया हस्तकला संग्रहालयाला भेट दिली. जेव्हा आतील प्रत्येक कलाकृती आम्ही पाहत होतो. तेव्हा एक विचार मनात आला की ज्याने आजपर्यंत स्वतःला," एका बांबूपासून किती वस्तू बनत असतील?" असा प्रश्न सुद्धा  विचारला नसेल त्याच्यासाठी
कारागिरांच्याप्रती  अभिमानाचा एक हा सुखद धक्का ठरेल.
      ‎
      ‎सुगरण पक्षी सुंदर विणलेले घरटे तयार करते.मात्र तिला त्यासाठी एक एक काडी मिळवावी लागते,पुन्हा ते विणावे लागते.खूप कष्टाचे काम आहे पण तिनं तिच्यातला हुनरीपणा आजही निरंतर जपून ठेवला.बांबूपासून कलाकृती तयार करणारे सुद्धा आपल्यासारखेच.आपण फक्त आपल्या पोटासाठी काम करत राहतो.हे कारागीर मात्र अनेकांचे बिना ढेकरचे पोट भरण्यासाठी काम करत राहतात. अशा कारागिरांची आपण एकही वस्तू विकत घेऊ शकत नाही,कारण आजही आपण मनाने एवढे गरीब आहोत जेवढे हे आदिवासी कारागीर नाहीत. त्यांच्या कष्टाला वाव मिळालाच हवा त्याबरोबर या लुप्त होत चाललेल्या कलेलासुद्धा.
      ‎
      ‎आपल्या भारताने नॉर्थ इस्ट हस्तकला जपून ठेवावी,त्यांना मानसन्मान द्यावा.असा विचार करत बाबा आमटे यांच्या या ओळी म्हणत म्हणत हस्तकला संग्रहालयातून बाहेर पडलो.....
      येथे नांदतात श्रमर्षी,
      ‎या भूमीला क्षरण नाही.
      ‎येथे ज्ञान गाळते घाम,
      ‎विज्ञान दानवक्षरण नाही.
      येथे कला जीवनमय,
      ‎अर्थाला अपहरण नाही.
      ‎येथे भविष्य जन्मत आहे,
      ‎या सीमांना मरण नाही.
      ‎
   © *Saudagar Kale.*
    8698611877
      ‎
      ‎
      ‎
      ‎
   ‎
   ‎

   ‎
   ‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...