हुनर खोज संवाद यात्रा-आसाम(3)

   #हुनर खोज संवाद यात्रा
   ‎#आसाम
   ‎# दिवस तिसरा:22 नोव्हेंबर.
                  ज आसाम राज्यातील गोलपाडा या जिल्ह्यात गेलो.या जिल्ह्याचा भाग खूप डोंगराळ नाही.येथील भाग पठाराचा असल्याने मोठया प्रमाणात लोकवस्ती आहे.मोठ्या प्रमाणात भात शेती आहे.उंचच्या उंच सुपारीचे व बांबूची झाडे आहेत.मोठया प्रमाणात प्रत्येकाचे घर बांबू पासून तयार केलेली आहेत.सिंमेंटचा शिरकाव सुद्धा काही गावामध्ये होत आहे. येथील शाळेचा मुलींचा युनिफार्म साडी आहे.
     ‎
     ‎येथील बहुतांश लोक आजही हातापासून बनविलेल्या साड्या, कपडे वापरतात. महात्मा गांधीजीचे स्वदेशीपणा या लोकांनी आचरणातून जिवंत ठेवला आहे.राभा, बोरो या आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात या राज्यात आहेत.
     ‎
     ‎गोलपाडा जिल्ह्यातील पुपयरंगा या आदिवासी गावात गेलो.त्या गावातील बहुतांश महिला शेतीला जोडव्यवसाय म्हणून दोरा निर्माण करण्यापासून ते विविध प्रकारचे,डिझाइनचे वस्त्र बनवतात.
     ‎त्यांची सर्व माहिती घेल्यानंतर काकपाडा या गावात गेलो.येथे आम्ही जाण्याच्या अगोदर आसाम मधील मीडिया आमची वाट बघत होती. कारणही तसंच होतं, ज्या व्यक्तीला आम्ही भेटणार होतो;तो एक कलावंत,कारागीर होता.अनेक तऱ्हेच्या बासऱ्या, वीणा, विविध प्रकारचे वाद्ये तयार करतात  त्याचवेळी मधुरपणे बासरी ,वीणा वाजवत साऱ्यांना अल्पोहारसोबत संगीतमय मेजवानी दिली.
    
             ‎याचवेळी आसामच्या मीडियाला ऋषिकेश सरांनी हुनर खोज यात्रेचे उद्दिष्ट्ये, भविष्यातील यावरचे नियोजन सांगत मुलाखत दिली.त्यांच्या कुटुंबानी हाताने बनवलेल्या राभा समाजाचे प्रतिक असलेला पंचा देऊन आमचा सत्कार केला.
    
           या गावानंतर  दारका गावात गेलो.तेथील एक वयोवृद्ध दादाजीना भेटलो.त्यांनी त्यांच्या गावात आदिवासी कारागिरांची कला जतन करणारे संग्रहालय उभारले.स्वतःच्या हिंमतीवर असं धाडस करणारा ,कारागिरांची कदर करणारा एक अवलिया त्यांच्यारूपाने पाहिला. त्यांच्या संग्रहालयात आदिवासी लोकांचे दुर्मिळ हत्यारे, तलवारी,मासे पकडण्याचे साधने, प्राण्यांचे विविध लाकडाच्या प्रतिकृती ,अजून बरंच काही अशा दुर्मिळ ठिकाणी जतन करून ठेवले आहेत.
     
     या आजोबांच्या मदतीने आम्ही जंगलात आढळणाऱ्या लवचिक लाकडापासून बनवत असलेल्या विविध वस्तू, प्राणी बनवणाऱ्या हुनर कारागिरला भेटलो.त्यानंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या लेडी राभा या कारागीर महिलेला भेटलो.त्यांनी स्वतःच्या कौशल्याने विविध प्रकारच्या डिझाईनच्या साड्या व वस्त्रे बनवल्या आहेत.
      ‎
      ‎हे सर्व पाहत पाहत आम्हांला 5 वाजल्या तेव्हा इथं रात्र झाली होती.पण अजून एका आदिवासी कारागिरला भेटायचं होतं.त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते कुटुंब शेकोटी पेटवून संवाद साधत होते.त्याच शेकोटीजवळ बसून आम्ही ते बनवत असलेल्या बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तूंची माहिती घेतली .अन गुवाहाटीकडे जाण्याचा परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा रात्रीच्या 9 वाजल्या होत्या.
      ‎दिवसभरांच्या कारागिरांची कला पाहून त्यांच्याप्रती  कवी अज्ञेय यांच्या या काव्यपंक्ती इथं लिहायला पाहिजेच.....
      ‎
शक्ति रहे तेरे हाथों में
छूट न जाय यह चाह सृजन की
शक्ति रहे तेरे हाथों में
रुक न जाय यह गति जीवन की!

        (क्रमशः)
© Saudagar Kale.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...