म्हणून..मी मोर्चात सामील झालो.

                      आजही ..लहानपणीचे दिवस आठवले की,हसू येतं.गुरूजींच्या पाठीमागे दररोज एक प्रतिज्ञा म्हणायचो."भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत". त्या लहानपणाच्या भोळया मनाला याचा अर्थही समजत नव्हता.  आज मात्र, आपण सारे भारतीय बांधव आहोत. हे  लहाणपणी खोटं म्हणून घेतलं जात होतं, हे सत्य समजतं.  
                  हे वास्तव सत्य समजण्यास सर्वस्व सरकारच गुन्हेगार होतं.शाळेमध्ये नाव घालताना दाखल्यावरची जात बघत होतं अन् त्याच शाळेमध्ये आम्ही    स्वातंत्र्य,समता,न्याय,बधुंता आणि धर्मनिरपेक्षता  ही तत्वे शिकत होतो.
         जेव्हा मी दहावीमधून अकरावीला  गेलो तेव्हा महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य शाखांची  ' मेरिट' लिस्ट दिसली.खरंतर माझ्या मते,ती एक 'कास्ट'लिस्ट होती.तेव्हा क्षणभर आपल्या गुणवत्तेसमोर'मराठा'ही जात आडवी आली असंही वाटलं.तेव्हापासून आतापर्यंत 'खुला प्रवर्ग 'म्हणून  खुल्या आकाशाखाली जीवन जगतो आहे.मग वाटलं सरकारला राज्यघटनेतील 'न्यायाचं तत्त्व' शिकवायला हवं.म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
       जेव्हा मी एकटा असाच विचार करत बसत असतो .तेव्हा या सरकारचं काहीच मला समजत नाही.एकीकडे 'सर्व शिक्षा अभियान' चालू करायचे अन् दुसरीकडे आम्ही पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेऊनही आम्हांला नोकऱ्या नाहीत म्हणून माझे बांधव दहावीनंतर गुणवत्ता असूनही मोलमजुरी करताना पाहिल्यास सरकार हे कोणतं 'शिक्षा' अभियान राबवत आहे ,हे कोडं उलगडतच नाही पण समाजात  शिक्षणाच्याबाबतीत कुठेही कमी पडू नये म्हणून माझ्या बांधवानी जमिनीसुध्दा विकल्या.आता जगण्यासाठी जमीनही नाही अन् तुमची नोकरीसुध्दा नाही.नेहमी एक वाक्य कानावर पडत आलंय,'बरं का?मुलांनो!सरकार आपलं माय-बाप असतं'.सरकार खरंच माय-बाप असेल तर मग एका मुलाला खाऊ घालायचं अन् दुसऱ्या मुलाला तो मोठा आहे म्हणून उपाशी   ठेवायचं,असं कुठले तरी माय-बाप करतात का? सरकार विसरलं  की काय पालकाची भूमिका!की विसरलं राज्यघटनेतील 'समता'हे तत्त्व.हेच सरकारला शिकवावं म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
                    आताही वाटतं आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं शिकायला हवं,पण  त्यांना जसं गुणवत्तेसमोर जातीचा विचार न करता शाहू  महाराज,सयाजीराव गायकवाड़ यांनी आर्थिक पाठबळ दिलं होतं,तसं सरकारनं आर्थिक दुर्बलांना द्य्यायला हवं  याचा विसर    पडला की काय? की त्यांची दूरदृष्टी अंधुक झाली.मला आजही वाटतं ,आपण भारतीय आहोत,भारतीय म्हणून मरायला हवं.पण तुमची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी जात विचारून उगीच जाती-धर्मात राजकारण घडवून आणते तेव्हा राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष'तत्त्वाचं काय?कशी निर्माण होईल आमच्यात बंधुता ?जाती-धर्माच्या रक्तासाठी माझं भारतीय रक्त आता कमी  कमी होत चाललं आहे.राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष','बंधुता' हे तत्त्वे सरकारला शिकवण्यासाठी म्हणून.. मी मोर्चात सामील झालो.
         मी आता ज्या क्षणी लिहित आहे त्या क्षणापर्यंत माझ्या माता-भगिनींवर अत्याचार झालेत.अत्याचार करणाऱ्याला जात नसते,पण अत्याचार सहन करणाऱ्यास जात असते.आयुष्यात शेतकऱ्यांना बेरजेचे अर्थकारण कधीच जमलं नाही ,पण तुमच्या बेरजेच्या राजकरणासाठी  शेतकर्‍यांचा बळी जात राहिला.आताच आरक्षणासाठी आमच्या एका बांधवाने आत्महत्या केली.हे सर्व अत्याचार करणाऱ्यांसाठी,व्यवस्थेचे बळी ठरून आत्महत्या करणाऱ्यांसाठी राज्यघटनेने दिलेल्या 'स्वातंञ्याचा' दुरूपयोग शेवटचा ठरावा म्हणून..मी मोर्चात सामील झालो.
               गौतम बुध्द आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही मोर्चे काढत आहोत.हे मोर्चे वादळापूर्वीची शांतता ठरू नये.ती कायम शांतता राहावी म्हणून..मी मोर्चात सामील झालो.         
                                                                                 सौदागर काळे,पंढरपूर.  
                       
                

फुटू दे दगडांना पाझर.....

          फुटू दे दगडांना पाझर......                                "माणसं सतत जग बदलण्याची भाषा करतात,पण स्वत:ला बदलण्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही."असं लियो टॉलस्टाय नावाचा थोर विचारवंत म्हणतो.                                                                      टॉलस्टाय जसं म्हणतो तसंच आमचं झालं आहे.2 ऑक्टों,2014 रोजी महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना आवहान करतात की,"मी कचरा करणार नाही,इतरांना करू देणार नाही." पण आम्ही,"मी कचरा करणार,पण इतरांना करू देणार नाही." असं वागतो.इथे आम्ही टॉलस्टायच्या विधानाचा अर्थ विविध प्रकारे  आजही  वास्तवात आणतो आहे.                                       सद्या भारतात फक्त कचऱ्याचा प्रश्न नाही तर प्रत्येक क्षेत्रात आज कचरारूपी समस्या आ वासून उभ्या आहेत.                                                     अणुअभियंते अनिल काकोडकर यानांच कचऱ्याचा प्रश्न न सुटल्याची लाज का वाटावी?प्रत्येक मुंबईकरांना कचरा रस्त्यावर टाकताना जेव्हा स्वत:ला लाज वाटेल,तेव्हा देवनार कचराभूमी डोंगर होण्यापासून वाचेल. आपल्या राज्यकर्त्यांना लाज कशाची वाटायला हवी अन् अभिमान कशाचा बाळगायला हवा हेच समजत नसेल तर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणं ही आपल्या आखूड बुद्धीच लक्षण नव्हे का?                          लातूरला कमी वेळेत रेल्वेने पाणीपुरवठा केला,याचा अभिमान मिरविणारे,पोस्टरबाजी करणारे राज्यकर्ते दुसऱ्या बाजूला आपल्या बांधवाना ही वेळ का आली? याची लाज न बाळगता आपल्या  बेफिकीरपणाचं प्रदर्शन जगासमोर करत आहेत.  आपण आपल्या घरातील कचरा ज्या सहजतेने रस्त्यावर टाकतो, त्याच सहजपणे आम्ही कचरारुपी लोकप्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत निवडून देतो,या साऱ्या समस्याचं मूळ आमच्या लोकशाही स्वातंत्र्यरूपी हक्कात येतं याची लाज कधीच आम्हां वाटली नाही.                                                 ज्योतिषाच्या सांगण्यानुसार आपल्या आलिशान गाडीचा क्रमांक बदलणारे धनिक अन् त्याच देशात किती दिवस जगण्याचा आकडा गाठू? या विवंचनेत उपाशी झोपणारे गरीब;ही खोल दरी पाहण्यासाठी पर्यटनाप्रमाणे राज्यकर्ते वर्षानुवर्षे पर्यटकाची भूमिका बजावत असतील तर तुमच्या माझ्या सारख्यां दगडांना आता पाझर फुटू दे... म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.                                        आमच्या ग्रामीण भागातील चित्र तर खूपच विचित्र!क्षणाक्षणाला लाज वाटणाऱ्या घटना घड़तात पण आम्ही हे सहन करायला संवेदनाहीन दगड झालो आहे हे नक्की . आजच्या दुष्काळात पाण्यासाठी वणवण  फिरणारे आम्ही;जिथे पाणी दिसेल तेथून पाणी आणत आहोत.मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आसताना  ते शुद्ध आहे की अशुद्ध;हे बाटलीबंद पाणी पिणाऱ्या पुढाऱ्यांना कसं कळणार?आम्ही कित्येक आजारांना आमंत्रण देतो आहोत हे आम्हांला दवाखान्याची पायरी चढल्यावरच समजतं.                                                 आमचा ग्रामीण भागातला बाप 'सरकारमान्य देशी दारुचे दुकान' हा फलक लावलेल्या दुकानात दारू पितो अन् त्याचीच मुलं 'विनाअनुदानित शाळेत शिक्षण'घेताना दिसतात; याची लाज ना दारू पिणाऱ्याला ना सरकारला !  सद्यस्थितीत विद्यापीठातून पदव्यांचे प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडणारे हजारो विद्यार्थी कचऱ्यासारखे निरुपयोगी ठरत  आहेत,याची लाज नेमकी विद्यापीठाला वाटायला हवी की;गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांना? आमचा देश जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून नाव मिरवतो पण त्याच लोकशाही देशात महिलांना समान हक्कासाठी आजही लढ़ा द्यावा लागतो;नेमका हा लढा कोणत्या ‘शाहीत’मोडतो याचं विवेचन सरकारनं जगाला लाज बाळगत द्यावं म्हणजे भारत’माता’ की जय! म्हणताना आम्हाला संकोच वाटणार नाही. ‘मन की बात’ मध्ये नरेंद्र मोदी आपल्या देशाला ऑलिंपिंक मध्ये पदके कमी मिळतात याची लाज वाटते हे  जगजाहीर करतात ,पण आमचा शेतकरी आत्महत्या करण्यात विक्रमच्या विक्रम प्रस्थापित  करत आहेत,याचा अभिमान त्यांना वाटतो की नाही? सारंच कसं आलबेल नाही का!  आपल्या देशात लाज वाटणाऱ्या अनेक समस्या आहेत.याचं मूळ संत कबीर म्हणतात तसं आपल्यात आहे."जो मन खोजा आपना,तो मुझ से बुरा न कोय" या उक्तीचा अर्थ आत्मसात करून तुमच्या माझ्या सारख्या दगडांना अशा प्रखर दुष्काळतही फुटू दे पाझर.....                          सौदागर किसन काळे                                                       

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...