कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?

कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?



मी मोर्च्यातील म्हातारीच्या फोटोशी बघतो ...
जी चालत आली होती @180...
भूमितीच्या ताठ सरळकोन सारखी
सरकारच्या काठीच्या आधाराशिवाय..
या व्यवस्थेचा बुरखा फाडण्यासाठी.
सरळ बाय सरळ थेट अनवाणी विधानभवनाकडे.....


ती जेव्हा जन्माला आली असेल
तेव्हा.. मंगल देशा..! पवित्र देशा..!
राकट देशा..! कणखर देशा..!
.......................महाराष्ट्र देशा !!!
अशा अर्थाची गर्वाने छाती फुगणारी कवने
कुणीतरी ती गाढ झोपेत असताना म्हटली असतील....

ती जेव्हा मोठी होत होत म्हातारी झाली 
तेव्हा ही व्यवस्था तिची लक्तरे तोडत राहिली
बंधनाच्या जोखडात बांधू लागली....
फक्त न फक्त तिनं हाडांचा सापळा म्हणून जगण्यासाठी......
काल ती मोर्च्यात दिसली
कुणाची सुटका करण्यासाठी?
तिची की महाराष्ट्राची!


तिच्या ...... 
पायाचे फोड 'आझाद' मैदानात दिसले
अन महाराष्ट्र @60 होण्याच्या आतच
थकलेलं मला दिसलं...
आता ती आर्तपणे ओरडत होती ......
ढोंगी देशा...!  शोषक देशा….!
दगडांच्या  देशा..! भ्रष्टराष्ट्र देशा!!..महाराष्ट्र देशा.!!
या साऱ्याला पुरावा होता तिचे रक्ताळलेले पाय…


ती म्हातारी नव्हती....
ती होती गरिबी, भूकबळी,दारिद्र्य, शोषणाचे प्रतिक....
भल्या पहाटे हे दाखवताना ती मुंबईच्या समुद्रात अश्रुंची भर टाकत होती.....

आता ती साठी ओलांडून गेलेली...
आणि हा साठीकडे झुकू लागलेला...
तिला पोट,हृदय आहे जिवंतपणाचं.
म्हणूनच आजही चालत आहे,पुन्हा चालण्यासाठी......

ह्याच्या "कल्याणकारी राज्य" च्या फायली
उंदरांनी केव्हाच कुरतडल्या आहेत...
दोघेही उंदीर सारखेच...
ते मंत्रालय पोखरतायत....
हे आपले मोर्च्याचे बिळे खणतायत..


मोरच्यावर मोर्चे ,मोरच्यावर मोर्चे 
निघणाऱ्या या मोर्चेराज्यात....
मी ही म्हातारी पाहिली..
ती कदाचित म्हणत असेल का!
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

आता एकाच उत्तराच्या शोधात आहे......
कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?
मोर्चात" 'महा'राष्ट्र "शोधणाऱ्या म्हातारीचे की 
मोर्चेच मोर्चे काढणाऱ्या महाराष्ट्राचे!

यातील सर्व फोटो#Kisan long March मधील आहेत.ते गुगलवरून घेतलेले आहेत.


©सौदागर काळे,पंढरपूर
8698611877

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...