गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास.....
#भाग1
#gandhifellowship
गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो.

गांधी फेलोशिपचे कार्य सध्या 14 राज्यात चालू आहे.भारतातील विविध राज्यातील निवड झालेले फेलो सुरुवातीच्या 10 दिवस ट्रेनिंगमध्ये एकत्र होतो.आमची बॅच ही 11 वी आहे.यावर्षी 400 च्या वर फेलो देशात गांधी फेलोशिपचे कार्य करत आहे.आज घडीला देशात शाळेपासून वंचित असणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे पण गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून खुपजण वंचित आहेत.देशात गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी गांधी फेलोशिपचे कार्य चालू आहे.


गांधी फेलोशिपचे मुख्य केंद्र राजस्थान मधील बगड (झुंझुंनू)येथे आहे. सर्व फेलो आपल्याला दिलेल्या राज्यातील लोकेशनवर येथूनच जाण्यासाठी निघतात.मला राजस्थान मधील झुंझुंनू हे लोकेशन मिळाले होते. जे गांधी फेलोशिपचे मुख्य केंद्राचे कार्यक्षेत्र आहे.जे राजस्थान मध्ये फेलो म्हणून कार्यरत आहेत त्यांना पिरामल फेलो म्हणूनही ओळखतात.

जुलै महिन्यातील सुरुवातीच्या 10-12 दिवसाचे प्रशिक्षण संपून विविध राज्यातील वेगवेगळ्या टीम दिलेल्या लोकेशनवर जाऊ लागल्या.आम्हांला झुंझुंनू जिल्ह्यातील खेतडी तालुका दिला होता.मुख्य केंद्रापासून 3-4 तासाच्या अंतरावर आहे. यासाठी आमची 7 जणांची टीम आहे.त्यात 2 पश्चिम बंगाल,2 उत्तर प्रदेश,1 गुजरात,1 दिल्ली,अन मी 1 महाराष्ट्र.त्यात पुन्हा इंजिनियर, MSW, कला ,विज्ञान क्षेत्रातील असे आमचे मिश्रण आहे.

आमची टीम

हे असे सर्वजण आम्ही .आमच्या लोकेशनवर निघालो. खेतडी हे आमचे लोकेशन 2 वर्षासाठी असणार होते त्यामुळे तिथे सर्व असेल का?तेथील लोक कसे असतील?शहर आहे की मोठे गाव आहे?आपण जिथे राहणार आहोत तेथील रूम कशा असतील?जेवण कसे असेल?असे अनेक साधे प्रश्न प्रवासात असताना पडत होते.

आम्ही  मुख्य केंद्रात बगड येथे प्रशिक्षण दरम्यान राहत होतो तेव्हा जुलै महिन्यात आपल्याकडे पावसाचे वातावरण होते पण येथे मात्र उष्णता आपल्याकडच्या मे महिन्यासारखी. आम्ही जिथे राहत होतो तिथे प्रत्येक रूममध्ये कुलर ची व्यवस्था केली होती.तरीही उष्णता जाणवत असे.मग वाटायचं येथे जुलै महिन्यात एवढी उष्णता तर मे महिन्यात किती असेल?दुसऱ्या राज्यातील फेलो 10 दिवसासाठी येथे होते पण ज्यांचे राजस्थान लोकेशन होते ते 2 वर्षासाठी येथे हे सहन करत राहतील हे मनात आले की जादा घाम यायचा....

हं... आम्ही आमच्या लोकेशन खेतडीकडे प्रवास करत होतो.खेतडी 20-25 किलोमीटर उरले होते तेव्हा डोंगराच्या रांगा दिसू लागल्या.काही काळासाठी का होईना आपल्या पश्चिम घाटाची आठवण आली. त्याच्यापेक्षा हायसं वाटलं की या डोंगराच्या सानिध्यात हे शहर असेल तर येथे उष्णता कमी असणार.हे असे विचार करत असताना पावसाच्या सरीपण बरसल्या.तेव्हा खूप आम्ही आनंदित झालो कारण येथे आल्यापासून पाऊस पडलाच नव्हता.अनेक प्रश्नांचे गाठोडे घेऊन रात्री 9 च्या आसपास गाडी प्रथम थांबली मुलींची जिथे राहण्याची व्यवस्था केली होती तिथे. आमच्या 7 जणांच्या टीममध्ये 3 मुली आहेत .त्या तिथे उतरल्या.उरलेले आम्ही सर्वजण मुलांची जिथे व्यवस्था केली होती तेथे उतरलो.रूम चांगल्या होत्या. सर्व सुविधा आहेत हे बघून बरं वाटलं.


संध्याकाळी खेतडी फोर्ट वरून दिसत असलेले खेतडी शहर

खेतडी हे शहर अरवली पर्वत रांगेने वेढले आहे.मध्यम लोकसंख्या आहे.हे शहराच्या आकारावरून समजून येते.ही नगरपालिका आहे.हे शहर डोंगरांनी वेढलेले आहे.त्यामुळे सकाळी अन संध्याकाळी वातावरण आल्हादायक असते. आमचे जिथे ऑफिस आहे त्याच्या टेरेसवरून समोर पाहिलं की एक किल्ला दिसतो .नंतर काही दिवसांनी समजलं की त्याला लोक खेतडी फोर्ट म्हणतात. एके रविवारी आम्ही सर्वजण तो बघण्यासाठी गेलो.किल्ल्यामध्ये काही ठिकाणी पडझड झाली आहे.पण महाल,तटबंदी अजूनही चांगले आहेत.या किल्ल्याचा ताबा एका ट्रस्ट कडे आहे.त्यामुळे शासनाचा येथे हस्तक्षेप नाही.असे दिसून येते.किल्यावर एक मंदिर आहे .परतताना त्या मंदिराचे पुजाऱ्याशी बोलणं झालं .त्यांना मराठी थोडी थोडी बोलता येते हे ऐकून खूप बरं वाटलं.काही वर्षांपूर्वी कोल्हापूर, सातारा भागात त्यांनी काम केले होते.त्यांनी सांगितले की,स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 ला शिकागो येथे जे भाषण केले.(नुकतेच या घटनेला 125 वर्षे पूर्ण झाली)तेव्हा जो भगवा वेष त्यांच्या अंगावर दिसतो तो खेतडी राजा अजितसिंग यांनी स्वामी विवेकानंद खेतडी फोर्ट येथे काही दिवस वास्तव्यास होते तेव्हा दिला होता.त्याच वेषात आजही आपण सर्वजण पाहतो.त्यामुळे येथील लोकांना ही कायम गौरवास्पद बाब वाटते.

भारतातातील प्रसिध्द व एकमेव तांब्याची खाण खेतडी मध्ये आहे.पूर्वी मुघल काळात चालू असलेली खाण कालांतराने बंद पडली होती.नंतर "हिंदुस्थान कॉपर लिमिटेडने" चालू ठेवली.शेखावटी प्रदेश मधील हा मुख्य प्रदेश होता.आजही उत्तर राजस्थान मधील झुंझुंनू,सीकर आणि चुरू या जिल्ह्यात अनेक शेखावटी काळातील कलात्मक नमुने दिसतात.झुंझुंनू हा जिल्हा भारतातील प्रमुख जिल्हा आहे जो भारताला मोठ्या प्रमाणात सैन्य पुरवठा करतो.

एका फेलोकडे 5 शाळा आहेत ज्या 12 वी पर्यंत आहेत.त्या शाळेतील प्रिन्सिपल, टीचर,युवक,संबंधित गावातील समाज यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळत आहे.

एका गावात गेलो.गावाचं नाव होतं,त्योन्दा.या गावातील शाळेत गेलो.त्या शाळेच्या प्रिन्सिपल यांना भेटलो.गांधी फेलोशिप बद्दल माहिती दिली.पिरामल फाउंडेशन बद्दल माहिती दिली.देशातील शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणण्यासाठी आम्ही फेलो एक माध्यम म्हणून काम करत आहोत,तरी या शाळेवर काम करण्यास संमती द्यावी.अशी विनंती केली.पण ते प्रिन्सिपल ऐकून घेण्यास तयार नव्हते.तुम्ही आमच्या शाळेवर काम करू शकत नाही.आमचे शिक्षक समर्थ आहेत.तुमची गरज नाही.असे बोलत राहिले.पुन्हा त्यांचे मन वळवण्यासाठी पुन्हा शाळेला भेट दिली.पण त्याचा उपयोग झाला नाही .शेवटी ते आम्हाला तुम्ही आंतकवादीही असू शकतात.माझ्या शाळेत प्रवेश करण्यास तुम्हाला अधिकार नाही.अशा चर्चाहीन बातचीत वर येऊन ते ठेपले.अशावेळी जबरदस्तीने काम करण्यात अर्थ नाही,असे समजून घेतले.ते प्रिन्सिपल शाळेच्या विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काही बाबतीत का होईना, अडसर ठरले होते.

पहिले दोन आठवडे आमची टीममधील एक -एक फेलो अशा उच्च माध्यमिक शाळेना भेट देत असे.प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असायचा.काहींना खूप आदर मिळत असायचा,तर काहींना निराशा हाती पडत असायची.पण कोणीच नकरात्मक सूर काढत नसे.कारण आपल्या देशातील शैक्षणिक अवस्था आजही  पारंपरिक मनाची आहे.बदलण्यास वेळ लागणार हे मनात प्रत्येकाने बिंबवले आहे.

नुकतेच एका केंद्रीय मंत्र्याने वक्तव्य केले की,शाळेनी सरकारकडे मदत मागू नये.असा बोलण्याचा त्यांचा सार होता.पुन्हा त्यांनी या बाबतीत घुमजाव केले तो भाग वेगळा.शाळा शासनाच्या मदतीवर चालतात.ती मदत मिळायला हवी.पण थोडा आपण विचार केला तर शाळा सुविधापूर्ण व गुणवत्तापूर्ण व्हायचे असतील तर गावातील लोक तेवढेच भागीदार असायला हवे जेवढे शासन असते.या भागातील भरपूर शासकीय शाळा गावातील लोक सुविधापूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.मदत तटपुंजी का असेना पण त्या संबंधित शाळेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.नाहीतर आपण हे..शासनाचे आहे चला फोडून -तोडून-फाडून टाकू असे विचार कृतीत आणत राहतो. हे बंद करण्यासाठी लोकसहभागातून शिक्षण खूप गरजेचे आहे.

टीमने शाळेच्या वर्गखोल्यात अशाप्रकारे लावलेले TLM

येथे प्रत्येक शाळेत दक्षिणा पेटी(अक्षय पेटीका) ठेवली जशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंदिरात आहेत.या शाळेतील दक्षिणा पेटी स्कुल कमिटीच्या समक्ष प्रत्येक अमावस्येला उघडली जाते.त्यातील पैशातून शाळेचे कामे होतात.यात विद्यार्थीही आपल्या परीने पैसे टाकतात.याबाबतीत घडलेली घटना मला खूप आवडली.खरंतर देशातील प्रत्येक शाळेने आदर्श घ्यायला हवा.तर मी नेहमीप्रमाणे माझ्या 5 शाळेतील एक शाळा -राजकीय आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय,माधोगढ.येथे सकाळी प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर गेलो होतो.(सध्या येथील शाळांचे वेळापत्रक 8:05 ते 2:10 आहे) प्रार्थना मधील राष्ट्रगान,गायत्री मंत्र,GK प्रश्न-उत्तर,योगा हे पार पडले.त्यानंतर प्रिन्सिपल सागरमल गुर्जर यांनी शाळेतील एका मुलीचा वाढदिवस होता,तिचे नाव घेतले.तिचे नाव घेताच ती पुढे आली.तिला सर्वानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर तिने तिच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या दक्षिणापेटीत 100 रुपयांच्या नोटांत पैसे टाकले.इथे ही बाब अनेकांना आदर्श निर्माण करून गेली.ज्या वयात आकृतिबंध नसलेली मौजमजा करायची सोडून हे संस्कार मिळत असतील तर ते खूप समाजाच्या जडणघडणीस आकार देत राहतात.आपल्या दृष्टिकोनातून कदाचित ही बाब गौण असू शकते पण तिथे त्या मुलीचे विचार उच्च होते.दक्षिणा पेटींची योग्य जागा कुठे असायला हवी!त्याचे हे एक उदाहरण.आपला पैसा कुठे दान करावा, गुंतवणूक करावा.ही समज आजही बहुतांश जणांना देशाचे शिक्षणक्षेत्र देऊ शकले नाही.हे तेवढेच सत्य आहे.....
एका शाळेतून बाहेर पडताना गेटवरच्या आतील बाजूस लिहिले होते….जरा सोचो आज आपने क्या सीखा..


Continue……….










तंतूच्या महावस्त्रातून : स्त्री-पुरुष संबंधाचा दिसलेला धागा…..

तंतूच्या महावस्त्रातून : स्त्री-पुरुष संबंधाचा दिसलेला धागा…..

तंतू ही कन्नड साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांची कादंबरी. या कादंबरीचा मराठीत अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला.850 पेक्षा जास्त पानांनी भरलेली ही प्रदीर्घ कथा.हे कथानक 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित करेपर्यंत घडत असते.म्हणजे तेव्हाचा राजकीय संदर्भ हा या कादंबरीचा मुख्य संदर्भ आहे.

मी नुकतीच ही कादंबरी वाचली .एका पत्रकाराचे कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत आहे.
या कादंबरीत भैरप्पा यांनी ग्रामीण-शहर,चंगळवाद-गांधीतत्वज्ञान वर आधारित समाजरचना,स्वातंत्र्यपूर्व पिढी-स्वातंत्र्योत्तर पिढीचा समाजहितसाठी योगदान देण्याची तफावत,नैसर्गिकपूरक शिक्षण-पाश्चात्य शिक्षण संस्कृती ,विकाऊ पत्रकारिता-निर्भीड ,निष्पक्ष पत्रकारिता, स्वार्थ-निस्वार्थ कर्म, सेक्सवर आधारित नैतिकता,नातेसंबंध, सरकारी नोकरांची भ्रष्टाचार करण्याची मनोवृत्ती, स्त्री मुक्ती-पुरुषीअहंभाव ,धार्मिक,संगीतसाधना,ध्यान-धारणा, अशा विविध विरोधाभास-परस्पर संबंध घटकांचा संच एकत्रित करून निर्माण केलेले सरळ,ओघवते कथानक वाचायला मिळते.

ही कादंबरी वाचल्यानंतर मी कोणत्या दृष्टिकोनातून या कादंबरीकडे बघितले हे प्रतिक्रियाच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.यात खूप घटक आहेत.सर्वांचे मिश्रित लिखाण मांडणे गुंतागुंतीचे होईल ,ते नीट मला सांगताही येणार नाही .हे लक्षात घेऊन सेक्स,स्त्री-पुरुष संबंध,अध्यात्म याच्या आधारे काही यातील वाक्ये आपल्याला विचार करायला लावतात.त्याच्या आधारे  सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तत्पूर्वी यातील काही पात्रांची ओळख करून देतो. रविंद्र हे विख्यात देशातील अग्रगण्य अशा एका इंग्रजी वर्तमानपत्राचे बेंगलोर आवृत्तीचे संपादक आहेत.त्यांची पत्नी कांती.मूळची दिल्लीत राहणारी आहे.विवाहानंतर रवींद्रबरोबर बेंगलोर मध्ये राहत असते.त्यांचा मुलगा अनुप.अनुपची पहिली कॉलेजची मैत्रीण रश्मी. दिल्लीतील घटस्फोट घेतलेली सरकारी नोकर असलेली कांतीची मैत्रीण शीतल अन सतारवादक हेमंत हाही मूळचा दिल्लीतला.यांची सर्वांची पार्श्वभूमी मोठी आहे तसेच या कादंबरीत भरपूर उल्लेखनीय पात्रे आहेत पण इथे मी थोडक्यात महत्त्वाचे कामापुरते पात्रे सांगितलेली आहेत.

रविंद्र हा गांधीविचाराचा पत्रकार आहे.सरळमार्गी, सत्याची कास न सोडणारा,भ्रष्टाचाराला थारा न देणारा . एकदा त्याचा मुलगा अनुप मित्रासमवेत  कॅबेरे मध्ये मुलींचे डान्स पाहताना पोलीसकडून पकडला जातो.तेव्हा सर्व मुले लहान असतात.अनुपला अशी वाईट सवय लागू नये म्हणून तो खेड्यातील गुरुकुल सारख्या गांधी-विवेकानंद यांच्या विचारावर चालणाऱ्या विद्याशाळेत घालतो.हे त्याच्या पत्नीला कांतीला पटत नाही. झपाटणाऱ्या बदलणाऱ्या जगात हा आपल्या मुलाला गावंढळ करत आहे अशी भावना कांतीच्या मनात वाढीस लागते.यातून तिचे रविंद्रबरोबर सतत भांडण होत राहते. एकदा कांतीच्या वडिलांचा दिल्लीतील घरी वाढदिवस असतो.तेव्हा सर्व नातेवाईक एकत्र  येणार असतात.तेव्हा तिला एकटीला तो दिल्लीला स्लीपरचे तिकीट काढून पाठवतो.धनवान कुटूंबात वाढलेल्या कांतीला नातेवाईकांसमोर अपमानस्पद वाटते .तिला रविंद्रच्या साध्या स्वभावाची चीड येत राहते.अशातच दिल्लीतील लहानपणीची मैत्रीण शीतलची भेट होते.तिच्या स्वतःच्या उच्चभ्रू राहणीमानाचा कांतीला हेवा वाटतो.शीतल कांतीला स्त्री-मुक्तीचे,स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे विचार सांगते.स्वतः आर्थिक सबळ होणे हे खूप गरजेचे आहे या धावत्या जगात. हे पटवून सांगत राहते.

दिल्लीतील हडसन येथील हॉटेलात पिझ्झा खाताना शीतल कांतीला सांगते,"सेक्स म्हणजे फन!नुसती गंमत!तहान लागल्यावर कोक प्यावा तसं किंवा भूक लागली की इथं हडसनला येऊन पिझ्झा खावा, तसं!"
पुढे म्हणते..
"इथं मनापासून पिझ्झा खाल्ला ,याचा अर्थ माझी माझ्या किचनवर निष्ठा नाही,की काय?माझा माझ्या स्वयंपाकघरावर किती जीव आहे.हे तुला ठाऊक आहेच.आपल्या देशात पुरुषांनी हे जाणलंय. ते फन म्हणून त्याचा आनंद लुटत असतात!बिचाऱ्या बायकाच फक्त जुन्यापुराण्या विचारांना आणि भाव-भावनांना लटकत घुसमटत राहतात!"

यातून शीतल कांतीला हे सूचित करते की स्त्रीयांनी सुद्धा पती व्यतिरिक्त आपल्या आवडणाऱ्या पुरुषांशी सेक्स करायला हवा.याचा पुरस्कार करताना इथे ती दिसते.
यानंतर कांती सुद्धा शीतल सारखे विचार व कृती करण्याचा मानस व्यक्त करते.दोघी दिल्लीत कपडे बनवून अमेरिकेला पाठवायचा व्यवसाय करतात. ती पतिकडे बेंगलोरकडे जात नाही.आलिशान राहण्याचा ,विमानातून फिरण्याचा शौक सहज पूर्ण करत राहते.पैसा खूप कमवते. आपल्या मुलाला अनुपला विद्याशाळेनंतर म्हैसूरला इंजिनियरसाठी ऍडमिशन घेऊन देते.अनुपला आपल्या बापापेक्षा पैशाच्या आधारावर सहज काम करणारी आई प्रिय वाटू लागते.

साधी राहणीमान-उच्च विचारसरणी,गांधी-विवेकानंद  यांचा आदर्श,ब्रम्हचर्य अशा संस्काराचा अनुप.शहरातील, कॉलेजमधील वातावरण बघून मुलीं आकर्षित करण्यासाठी सायकल मारण्याचा अनुभव असणारा अनुप आई कांतीकडे बुलेट घेण्यासाठी हट्ट करतो अन ती पूर्ण करते.रवींद्रला मात्र हे पटत नाही. त्याचा कांतीवर मुलाला चंगळवादाकडे प्रेरित करत आहे ,याचा राग येत राहतो.

बुलेट आल्यानंतर कॉलेजमधील रश्मी नावाची सुंदर मैत्रीण अनुपला मिळते.दोघेजण भरपूर पार्ट्या-बुलेटवर फिरणे नित्याचेच होते.एकेदिवशी तो तिला बेंगलोर येथील कॅबेरेत अंगप्रदर्शन करत डान्स करणाऱ्या तरुणींना पाहण्यास जातात.तेव्हा हे रश्मीला खूप आवडते.तीपण अनुपला टेपरेकॉर्डरवर आपला डान्स लॉजवर अंगप्रदर्शन करत दाखवत असते. तेव्हाच ती कॅबेरे मध्ये डान्स करण्याचा निश्चय व्यक्त करते. तसे अनुपला सांगते.तेव्हा अनुप तिला प्रखर विरोध करतो.आपल्या प्रेयसीने असे कपडे उतरून नाचलेले आवडणार नाही ,हे तिला ठणकावून सांगतो.पण आपल्या कलेपुढे त्याच्या विचाराला भीक न घालता युक्तिवाद करताना त्याला सांगते,"एवढ्या लोकांपुढे कपडे उतरवणं वाईट असेल,तर एवढ्या लोकांनी ते पाहणं वाईट नाही का?एवढ्या वेळा कॅबेरे बघणारा तू कसा चांगला ठरतोस मग!शिवाय हॉटेलमध्ये मी केलेला कॅबेरे बघणारा तुही वाईटच ना?"

पुढे हे ही सांगते की,"चित्रकार आपली कला हजार वर्ष दाखवू शकतो;शरीराचं सौंदर्य मात्र तारुण्य असेपर्यंत दाखवणं शक्य आहे."

हा संवाद वाचल्यानंतर आपली आई, बहीण,मुलगी,पत्नी सोडून स्त्रीकडे चुकीच्या नजरेतून बघण्याचा आपला दृष्टिकोन ठळक अधोरेखित होतो अन ती नैतिकतेचा आपला बुरखा फाडते.

अनुप मात्र विरोध करण्याच्या पुरुषी वृत्तीवर ठाम राहतो.रश्मी आपल्या कलेसाठी त्याचा संबंध सोडते.एकाकी असताना अनुप स्वतःशीच संवाद साधताना म्हणतो, "ब्रम्हचर्याच्या टोकाच्या कल्पनेत तडफडत मनाची फरपट करण्यापेक्षा शरीराच्या मागणीचा आदर करून शांतपणे अभ्यास करणं का अयोग्य ठरावं?"असा विचार करून दुसऱ्या मैत्रिणीशी लैंगिक संबंध ठेवत राहतो.नंतर नंतर एका खेड्यातील अडाणी सुंदर मुलीशी पैसेदेऊन संबंध ठेवतो.ती मुलगी गरोदर होण्याचेही प्रकरण घडते.अनुपची आई कांती हे प्रकरण पैसे देऊन मिटवते.अशावेळी वडीलांच्या वर्तमानपत्रामधून मुलाची बाजू न घेताही यावर लेख लिहिले जातात.आई मात्र पांघरूण टाकण्यासाठी पैशाचा वापर करते. तेव्हा हे असे गरीबांचे चारित्र्य  विकत घेणे हे आजचे नाही,हे लक्षात येते.

अनुपचे गरोदर प्रकरण शिवराज या अमेरिकेतून शिक्षण घेतलेल्या तरुण प्राध्यापकास समजते.आपल्या भारतात बलात्कार मोठ्या प्रमाणात का घडतात याचे उत्तर दोघाच्या संवादात दिसते.शिवराज अनुपला म्हणतो,"मनाला छळणाऱ्या कामवासनेला बाहेर पडायला मार्ग असेल,तर समाजजीवन शांत राहतं!याच मूलभूत सत्यावर त्यांचा(अमेरिकेचा)समाज उभा आहे!आपण ती भावना दडपून टाकणारी नीती स्वीकारली आहे,म्हणूनच आपला समाज मागं राहीला आहे!"
लहानपणी विद्याशाळेत असताना इंजिनिअर बनून देशातील गरीबांसाठी योगदान देण्याचे मनोदय व्यक्त करणाऱ्या अनुपला भारत देश मागास विचारसरणीचा, इथे बदल अशक्य आहे असे मनात विचार आणून शिक्षणाच्या नावाखाली अमेरिकेलाही जातो.अन लहानपणाच्या संस्काराचा काहीच फायदा नाही,धावत्या जगात.हे पण अधोरेखित होते.

दुसरीकडे दिल्लीत असणारी कांती आता रविंद्रला म्हणजे पतीला विसरून गेली होती.त्याचवेळी विद्याशाळा सोडून दिल्लीला आलेला हेमंत होन्नती हा सतारवादक तिच्याच वयाचा .तिलाही संगीत ऐकण्याची खूप आवड असते.लग्न न केलेल्या तरुणाशी पुन्हा पुन्हा भेट होत राहते.हेमंतने आपल्या कलेसाठी उच्चशिक्षणावर पाणी सोडलेले असते.तो बेंगलोर पासून जरा दूर असलेल्या खेड्यातील विद्याशाळाजवळ असणाऱ्या डोंगरावर सतार वादनाची साधना करत असत.शाळेतील मुलांनाही शिकवत.त्यामुळे तिथेच अनुप,रविंद्र आणि कांताची ओळख झालेली.हेमंत रवींद्रला मोठ्या भावाप्रमाणे मानत असत.

दिल्लीमध्ये हेमंत परतल्यानंतर त्याच्या सतार वादनसाठी कांती मदत, गुंतवणूक करू लागली. त्याचेच रूपांतर प्रेमात झाले नंतर लैंगिक संबंध ठेवण्यापर्यंत.

धार्मिक स्वभावाच्या हेमंतला आपण खूप मोठी चूक केली आहे.मोठ्या भावासमान असलेल्या रविंद्र यांच्या पत्नीशी असे संबंध ठेवायला नको होते.हे सतत त्याला जाणीव होत होती. पण कांती त्याला मी स्वतंत्र स्त्री आहे.मी आता रविंद्रची पत्नी नाही हे समजूत काढुन संबंध तसेच चालू असायचे. अशीच एकदा त्याच्या मनोवृत्तीवर उपाय काढताना कांती हेमंतला म्हणते, "समाजातील कुब्ज नीती-नियमांचे विचार फेकून दिल्याशिवाय कलेच्या अथांग अवकाशात भरारी घेणं कसं शक्य आहे?"
असं सांगताना कोणत्याही कलेला प्रणयही तेवढाच आवश्यक आहे.हे ते स्पष्ट करते.

अशी कितीही समजूत काढली तर तिचा पती रविंद्र यांची आठवण आली की  हेमंतला खूप अपराधी वाटत.असच एकदा यावर वादविवाद करताना कांती म्हणाली, "तू माझ्याकडे वेश्या म्हणून बघतोस काय!"अशा अर्थाने भांडण वाढत जाते.अन ते एकमेकांचे संबंध तोडतात.तेव्हा हेमंत मनाशी बोलतो,"मी तिच्याकडे वेश्या म्हणून बघतो ,असा तिनं माझ्यावर आरोप केला.पण हिनं तर मलाच पुरुष वेश्या म्हणून वापरलं आहे!"
हे वाक्य वाचल्यानंतर विचारशील वाचकाला हेमंतचा हा मुद्दा विचार करण्यास भाग पाडतो.

नंतर कांतीशी संबंध तोडल्यानंतरही हेमंत याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी अध्यात्मची जाण असणाऱ्या आपल्या लैंगिक संबंधाबाबत विचारत.तेव्हा त्याला कृष्ण-राधेचा प्रणय हा संदर्भ मिळत.एके दिवशी हाच मुद्दा दहनविधी क्रिया पार पाडणाऱ्या महाराजाला तो विचारतो.तेव्हा तो हेमंतला सांगतो,"आपल्याला कृष्णविषयी कुठल्या-कुठल्या मूळ ग्रँथामधून समजतं?महाभारत, हरिवंश,भागवत आणि विष्णु-पुराणातुन, तर या ग्रँथामध्ये कुठंही राधेचा उल्लेख नाही."

म्हणजे याचा अर्थ असा निघतो की अनैतिक लैंगिक संबंध झाकण्यासाठी कृष्ण-राधेचा वापर झालेला आहे.याला पुष्टी देताना ते महाराज पुन्हा म्हणतात की,"राधा कृष्णापेक्षा मोठी आहे.आपल्यापेक्षा प्रौढ स्त्रीशी समागम केला तर आयुष्य घटतं आणि लहान  स्त्रीशी केला तर आयुष्य वाढतं, हा हिंदूंचा विश्वास आहे."

हे वाक्य हिंदु धर्मात खरं ठरलेलं आजही वाटतं. कारण विवाह करताना पुरुष कमी वयाच्या स्त्रीची निवड करतो. आजची ही परंपरा मान्य करून त्याकाळी कृष्णाने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या राधेशी प्रणय केला नसणार. हे  या वाक्यावरून वाचक असा तर्क काढतात.

हेमंतने संबंध तोडल्यानंतर ती एकाकी पडते.हरिशंकर या सतारवादनाच्या विख्यात पण स्रियांचा नाद असलेल्या व्यक्तीशी संबंध जोडते.तोपण तिची फसवणूक करून सोडतो.


त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये भागीदार असणारी कांतीची मैत्रीण शीतल हिला भागीदारीतून काढण्याच्या रागातून सुडापोटी कांतीचे-हेमंतचे लैंगिक संबंध स्पष्ट करणारे निनावी पत्रे पती रविंद्रला ,मुलगा अनुपला,हेमंतच्याआई-वडिलांना पाठवते.रविंद्र तिला तू अशी का वागली म्हणून जाब विचारतो.ज्या मुलाला पाहिजे तेवढा पैसे पुरवला ,त्याचे अनैतिक कारनामे झाकलेल्या आईला चापट मारून अनुप जाब विचारतो.ते दोघेही नंतर तिचे स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व मान्य करतात.


..एवढा पैसा मिळवूनही ती शेवटी एकाकी होते.पण तिच्याकडे संशय नजरेने पाहणाऱ्या वाचकांना या कादंबरीतीलच एक वाक्य तेवढंच आत्मपरीक्षण करायला लावते.

"नात्यामध्ये पुरुषानं पुढाकार घेतला ,तर क्षम्य;आणि स्त्रीनं पुढाकार घेतला ,तर पाप?"

©सौदागर काळे.
 20-06-2018

....अन स्वप्नांचे पंख छाटत राहते

....अन स्वप्नांचे पंख छाटत राहते.

मध्यरात्री गावच्या शांततेत
कुत्र्यांचे भुंकणे ,
मांजरांनी दबक्या पावलांनी
शिकार शोधणे,
अन माणसांचे घोरणे.
ठरल्याप्रमाणे रोज घडत राहते.

अनोळखी दावणीस बांधलेल्या
बकऱ्याचा बे बे असा आर्त आवाज
उपाशीपोटी असलेल्या
कुत्र्याचे भीतीदायक रडणे,
आईच्या कुशीत निजलेल्या
बाळाचे आकस्मिक रडणे.
हे अंधाऱ्या भुडुक गावात
गाढ झोपलेल्याना जाग आणत राहते.

सारं काही शांत असताना
झाडावरची वाळलेली पाने
अलगद खाली पडत राहतात.
पण दुरून कुठूनतरी कानी पडणारा
टाळ-मृदंगाचा स्वर,
खोकणाऱ्या म्हाताऱ्यास
दिलासा देत राहतो.

अशा भयाण काळोखात
नजर रोखून बघणारे घुबड
पांघरूण घेण्यास भाग पाडते.
तेव्हा मिटलेल्या डोळ्यातला
काळोखसुद्धा ओळखीचा राहत नसतो.

रात्र पुन्हा गाढ झोपेत घोरत राहते,
........अन स्वप्नांचे पंख छाटत राहते.

©फिरस्ती.

http://firstisk.blogspot.com

कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?

कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?



मी मोर्च्यातील म्हातारीच्या फोटोशी बघतो ...
जी चालत आली होती @180...
भूमितीच्या ताठ सरळकोन सारखी
सरकारच्या काठीच्या आधाराशिवाय..
या व्यवस्थेचा बुरखा फाडण्यासाठी.
सरळ बाय सरळ थेट अनवाणी विधानभवनाकडे.....


ती जेव्हा जन्माला आली असेल
तेव्हा.. मंगल देशा..! पवित्र देशा..!
राकट देशा..! कणखर देशा..!
.......................महाराष्ट्र देशा !!!
अशा अर्थाची गर्वाने छाती फुगणारी कवने
कुणीतरी ती गाढ झोपेत असताना म्हटली असतील....

ती जेव्हा मोठी होत होत म्हातारी झाली 
तेव्हा ही व्यवस्था तिची लक्तरे तोडत राहिली
बंधनाच्या जोखडात बांधू लागली....
फक्त न फक्त तिनं हाडांचा सापळा म्हणून जगण्यासाठी......
काल ती मोर्च्यात दिसली
कुणाची सुटका करण्यासाठी?
तिची की महाराष्ट्राची!


तिच्या ...... 
पायाचे फोड 'आझाद' मैदानात दिसले
अन महाराष्ट्र @60 होण्याच्या आतच
थकलेलं मला दिसलं...
आता ती आर्तपणे ओरडत होती ......
ढोंगी देशा...!  शोषक देशा….!
दगडांच्या  देशा..! भ्रष्टराष्ट्र देशा!!..महाराष्ट्र देशा.!!
या साऱ्याला पुरावा होता तिचे रक्ताळलेले पाय…


ती म्हातारी नव्हती....
ती होती गरिबी, भूकबळी,दारिद्र्य, शोषणाचे प्रतिक....
भल्या पहाटे हे दाखवताना ती मुंबईच्या समुद्रात अश्रुंची भर टाकत होती.....

आता ती साठी ओलांडून गेलेली...
आणि हा साठीकडे झुकू लागलेला...
तिला पोट,हृदय आहे जिवंतपणाचं.
म्हणूनच आजही चालत आहे,पुन्हा चालण्यासाठी......

ह्याच्या "कल्याणकारी राज्य" च्या फायली
उंदरांनी केव्हाच कुरतडल्या आहेत...
दोघेही उंदीर सारखेच...
ते मंत्रालय पोखरतायत....
हे आपले मोर्च्याचे बिळे खणतायत..


मोरच्यावर मोर्चे ,मोरच्यावर मोर्चे 
निघणाऱ्या या मोर्चेराज्यात....
मी ही म्हातारी पाहिली..
ती कदाचित म्हणत असेल का!
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

आता एकाच उत्तराच्या शोधात आहे......
कुणाचं म्हातारपण जास्त काळ टिकेल ?
मोर्चात" 'महा'राष्ट्र "शोधणाऱ्या म्हातारीचे की 
मोर्चेच मोर्चे काढणाऱ्या महाराष्ट्राचे!

यातील सर्व फोटो#Kisan long March मधील आहेत.ते गुगलवरून घेतलेले आहेत.


©सौदागर काळे,पंढरपूर
8698611877

शहरी आपत्ती व्यवस्थापन :जग आणि भारत

शहरी आपत्ती व्यवस्थापन :जग आणि भारत

          Source: Internet (mumbai)

पत्ती म्हणजे थोडक्यात अचानक भेडसावणारी विनाशकारी घटना.यामुळे व्यापक प्रमाणात होणारे भौतिक नुकसान. आपत्तीचे ढोबळमानाने आपण दोन प्रकार पाडतो
1)नैसर्गिक आपत्ती   
2)मानवनिर्मित आपत्ती.
                     Source: Internet
         
पण भारत सरकारने सन 1999 साली आपत्तीचे वर्गीकरण करण्यासाठी पंत समिती नेमली होती. त्यांनी पुढील 5 प्रकारचे आपत्तीचे  वर्गीकरण केले होते.

 ‎1)पाणी आणि हवामान बदल संबंधी आपत्ती
    उदा. ढगफुटी,चक्रीवादळे
 ‎
2)भूमीसंबंधी आपत्ती उदा.भूकंप,खाणी मधील आग
 
 ‎3)दुर्घटना संबंधी आपत्ती.उदा.शहर -जंगल आग,रेल्वे दुर्घटना.
 ‎4)जैविक आपत्ती उदा.साथीचे रोग
  
‎5)रासायनिक, औद्योगिक आणि परमाणू संबंधी आपत्ती उदा.भोपाळ दुर्घटना.

         या वरील सर्व आपत्तीस प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष माणूस प्राणी जबाबदार आहे.त्यातल्या त्यात जगातील सर्व शहरे या आपत्तीस खूप जलद व सहज बळी पडलेले आहेत.
  
   आपल्याकडे हडप्पा संस्कृतीतील धग्गर नदीतीरावरील कालीबंगन या ऐतिहासिक शहराचा नगरनियोजनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून दाखला दिला जातो.

               Source: Internet
     जगाची लोकसंख्या काळानुसार वाढू लागली तशी आपली शहरे विकासाच्या नावाखाली सुविधा देण्यातील असमानता, विषमता,झोपडपट्टीतील गलिच्छपणा, आपत्ती व्यवस्थापन चुका,ओंगळपणा यांचा 'रोज मरे त्याला कोण रडे' या म्हणीप्रमाणे बेफिकरपणे दुर्लक्ष करू लागले.
       ‎
      आपल्या देशाचा कॅगचा अहवाल सांगतो की,'देशाचे आपत्ती व्यवस्थापन खूप दयनीय अवस्थेत आहे.' तर विश्व बँकेच्या म्हणण्यानुसार भारताचे आपत्तीवर खूप नुकसान होते. ते एवढे की जीडीपीच्या 2 % च्या आसपास आहे.खरंतर खरी गंभीर बाब ही आहे की एवढी रक्कम सार्वजनिक आरोग्यसाठी सुध्दा कधी खर्च केली नाही.(शिक्षण क्षेत्र तर खूप दूरची गोष्ट)

           यावरून मात्र नक्की समजतं की आपले प्रशासन,राजकारणी सढळ हाताने पैसे या क्षेत्रांत ओततात.पण परिस्थिती जैसे थी!नेमकं पैसे जातात कुठं?हा प्रश्न कुणाच्याही मनात स्वाभाविकरित्या येतो.

                Source: Internet
                  
 त्यात अजूनही आपल्या देशातील काही राज्यांत शहराचे नियोजन ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या "टाऊन अँड कंट्री प्लानिंग ऍक्ट" वर आधारित आहे जे ब्रिटिशांनी सुद्धा त्यांच्या देशात कालबाह्य केले. 'बदल' ही एकमेव स्थिती आहे जी परिस्थिती नुसार आपण तिचा स्वीकार करत रहावा.ते स्वीकारणं आपल्याने होत नाही.असंच यावरून म्हणावे लागेल.

          संयुक्त राष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यालयानुसार ,गेल्या दोन दशकात जगाने आपत्तीमुळे 13 लाख  लोक गमावले आहेत.2 लाख खरब डॉलर आर्थिक नुकसान झाले .त्यात मोठ्या प्रमाणात शहरे शिकार झालेत. हे विसरून चालणार नाही.

            Source: Internet
  आंतरराष्ट्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन या प्रश्नावर मार्च,2015 मध्ये जपान या देशात सेदंई या शहरात परिषद झाली.ती "सेदंई फेमवर्क 2015-2030" म्हणून ओळखली जाते. (अधिक माहितीसाठी:http://webtv.un.org/%C2%BB/watch/the-sendai-framework-for-disaster-risk-reduction/4806061854001)
यात चार गोष्टींवर भर दिला गेला.
1)आपत्तीस समजणे
2)आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी लवचिकतेसाठी गुंतवणूक करणे.
3)धोक्याचे व्यवस्थापन करण्यासाठी धोका नियंत्रणास मजबूत करणे
4)आपत्तीनंतर पुनवर्सन, पुनर्रचना यात जलद तत्परता दाखवणे.

                  Source: Internet
      संयुक्त राष्ट्र महासभेने सप्टेंबर ,2015 मध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट कार्यसूची जाहीर केली त्यात 8 आपत्ती संबंधी मुद्द्यांचे समाविष्ट केले आहेत.त्यानंतर डिसेंबर,2015 मध्ये पॅरिस हवामान बदल सामंजस्य करारात सुद्धा आपत्ती समस्येला प्राधान्य दिलेले आहे.या सर्व परिषदेत आपला भारत अग्रभागी आहे.
आपत्ती व्यवस्थापन कार्यसूचीचा हा उद्देश यातून दिसून येतो की,"विकासाच्या प्रत्येक गोष्टीत आपत्ती धोका कमी करण्यासाठी विशेष तरतूद करायला हवी" याची अंमलबजावणी आपले सरकार करेल का?यावर विशेषतःआपल्या शहरांचे भविष्य अवलंबून आहे हे नक्की.
             Source :Internet
आपत्ती व्यवस्थापनवर संपन्न झालेल्या 3-5 नोव्हेंबर 2016 च्या परिषदेत मा.पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 10 सूत्री अजेंडा जाहीर केला तो पुढील प्रमाणे:

1) All development sectors must imbibe the principles of disaster risk management.

2)Work towards risk coverage for all-starting from poor households to SMEs to multi-national corporations to nation states.

3) Encourage greater involvement and leadership of women in disaster risk management

4) Invest in risk mapping globally. For mapping risks related to hazards like earthquakes we have accepted standards and parameters

5) Leverage technology to enhance the efficiency of our disaster risk management efforts.

6) Develop a network of universities to work on disaster issues.

7) Utilize the opportunities provided by social media and mobile technologies.

8) Build on local capacity and initiative.

9)Opportunity to learn from a disaster must not be wasted. After every disaster there are papers on lessons that are rarely applied.

10)Bring about greater cohesion in international response to disasters.

हा 10 सूत्री अजेंडा प्रत्यक्षात आल्यास तो दिवस भारतीयांसाठी विशेषतः शहरवासीयांसाठी नवी पहाट असेल.
        
परंतु  सध्या आपली शहरे आपत्तीचे आगार झालेत,हे सर्वश्रुत आहे.इथं बंगळुरू या शहराचे उदाहरण घेता देईल.या शहरात 2500 नैसर्गिक सरोवरे होती. ही सरोवरे एकमेकांस जोडलेली होती. जर मोठ्या प्रमाणात पाऊस,ढगफुटी झाली तर जास्त पाणी आपोआप दुसऱ्या सरोवरात जात असे.पण सद्या मानवनिर्मित अतिक्रमण, प्लास्टिक कचरा यांमुळे हे नामशेष होऊ लागले अन आज थोडा जरी पाऊस पडला तर 'शहर पाण्यात 'अशा बातम्या प्रत्येक पावसाळयात कानी येऊ लागल्या.त्यात मुंबई शहर आघाडीवर दिसू लागले.
     
           रेल्वेपूल दुर्घटना,या वर्षीच्या पावसात नदीसारखे रूप धारण केलेली मुंबई, काही दिवसांपूर्वी घडलेले कमला मिल आगीचे प्रकरण.तसंच मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या अन तिला कवेत घेऊ न शकणारी मुंबई.हे सर्व नियंत्रण करू न शकलेली आपली प्रशासन व्यवस्था.
      
    ‎हे सर्व पाहिल्यानंतर माझ्यासारख्या ग्रामीण भागातील नागरिकाला हे शहरे आधुनिक राक्षसे वाटू लागले आहेत.ते केव्हाही झडप टाकून खाऊन टाकतील. मला  नैसर्गिक 'जगण्याचा अधिकार' मिळाला तसंच भारताच्या राज्यघटनेने सुद्धा दिला. पण या व्यवस्थेला मला कृत्रिमरित्या 'मारण्याचा अधिकार' कोणी दिला? असा सवाल आता विचारला पाहिजे.
     
               Source: Internet
सुंदर सारुक्की आपल्या 'द हिंदु' च्या एका लेखात म्हणतात,"जिन्होंने इस शहर को जवान, मासूम और वास्तविक बगीचों से भरा देखा है,और इसके फलने-फूलने की कल्पना की है,उन्होंने भी अब वह स्वप्न देखना छोड़ दिया है। तो अपना भविष्य मरता है, तभी शहर सचमुच मर जाता है।”
                          
                       -Saudagar kale.

संदर्भ:
1)योजना मासिक :
सप्टेंबर 2014 व जाने,2017.
2)द हिंदू न्यूजपेपर.
3) द इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर
4)http://webtv.un.org
       ‎

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...