नरेंद्र दाभोळकरांना एक अनावृत्त पत्र

प्रिय दाभोळकर,
       तुमच्या देहाला मारून आता चार वर्षे होत आहेत.तुमचा मारेकरी अन आमच्यातली अंधश्रद्धा दोघेही दरोडेखोर असल्यासारखे लपून बसलेले आहेत. एकवेळ मारेकरी सापडेल पण त्याच्यातला नथुराम नाही सापडणार,एवढं मात्र खरं.
   तुम्हाला मारल्यानंतर त्यांनी'शिवाजी कोण होता'असं सांगणाऱ्या गोविंद पानसरेना मारलं,त्यांनतर कर्नाटकमधील कुलबर्गी यांना मारलं.तसं तर आजपर्यंत देवाच्या व अंधश्रद्धेच्या नावावर अगणित माणसं मारली आहेत.पण त्या अगणित माणसांमध्ये तुम्ही नव्हता पण तुमच्यामध्ये अगणित माणसं होती, म्हणून आज तुमची आठवण आल्याशिवाय राहवत नाही.
   
तुम्ही सतत म्हणत असायचा की,'आमचा देवाला विरोध नाही;पण देवाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्याचा विरोध आहे' साधं सोपं समीकरण होतं हे अंधश्रद्धेविरुद्ध .परुंतु आजही आम्ही त्याच दुकानांमधून श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा खरेदी करीत असतो.
   
काही दिवसांपूर्वीच तुमच्या साताऱ्यात एक घटना घडली. चंद्रग्रहण होतं.ग्रहणाच्या कालावधीत काही खाऊ नये म्हणून एका गरोदर मातेस उपाशी ठेवलं.त्यात तिचा मृत्यू झाला .दुसरीकडे सालाबादप्रमाणे यावर्षीही सरकारच्या आशीर्वादाने कृष्णाच्या स्वागतासाठी दोन-तीन तरुणांचे बळी गेले.असे अंधश्रद्धेचे थर दिवसेंदिवस रचताना पाहून 'कुंपनच शेत खात आहे 'असं वाटून आम्ही हताशपणे आमच्याच चेहऱ्याकडे  पाहत असतो.

आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी 'मंगळमोहीम' यशस्वी केली.नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलं,अशावेळी आपल्या देशाचा पंतप्रधान देशातील नागरिकांना  आपल्या पत्रिकेवरचा 'मंगळ 'मनातून काढून टाकण्याचे आव्हान करतील असं वाटलं होतं.पण ती आशा फोल ठरली. तशी त्यांनी  'मन की बात 'केली असती तर शास्त्रज्ञांना या समाजिक सुधारणेसाठी मोठं बक्षिस ठरलं असतं.

ते जाऊ द्या,अजून एक सांगतो .आपल्या महात्मा गांधींनी ज्या दिवशी 'चले जाव' म्हटलं होत त्याच दिवशी देशभरात शास्त्रज्ञांचे मोर्चे निघाले.तर मध्यप्रदेश सरकारने एक फतवा काढला की, रुग्णांनी डॉक्टरांना भेटण्याच्या अगोदर ज्योतिषांना भेटायला हवे.तर एका वर्तमानातपत्रात वाचायला मिळाले की,निधीअभावी गणित तज्ञांना संशोधन सोडावं लागतं आहे.ही सारी परिस्थिती पाहिली की वाटत इंग्रज जसे देशासाठी जाणं गरजेचे होते तसे त्यांचे आधुनिक विचार सुद्धा का?
तुम्ही गेल्यानंतर सरकारने वटहुकूम काढून 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 'केला,नुकताच आता 'जातपंचायत विरोध 'कायदा केला.
या कायद्याद्वारे सरकारने फक्त धाक घातला, पण परिवर्तन करणारे तुम्ही या सर्वांसाठी बळी गेला.

आता आम्हांला एवढं मात्र नक्की कळत आहे.तुम्ही जसा संपला नाही तसा नथुरामही संपला नाही.फरक एवढाच आहे, तो शरीर मारत सुटला आहे.अन तुम्ही पुढील पिढीत नथुराम जन्मालाच येऊ नये,म्हणून विचार देता आहात.

तरीही वाटत राहतं ,'आपण एका तळ्यावर आहोत. तेथील लहान लहान दगड पाण्यात टाकतो आहोत.ते दगड तळ्यात खोलवर जात आहेत.तसाच तुमचा विवेक शांतपणे डोक्यात जात आहे.'तो विवेकाचा एकांतपणा कोणताच नथुराम मारणार नाही,यावर मी ठाम आहे.म्हणून गांधी, तुम्ही,पानसरे,कुलबर्गी कायम माझ्याजवळ  आहात.नव्या पालवीच्या रुपात.
              
                       तुमचाच एक,
                           विचार.
©Saudagar Kale.
(छायाचित्र सौजन्य-गुगल)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...