...हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो.


_...हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो._
                       (छायाचित्र:गुगल)      
      आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोकावत राहतं तसंच काही पुस्तक माझ्या मनात डोकावत राहिली.काही पुस्तकं हास्यक्लबला न जाताही मनमुराद हसण्यास शिकवत आली.काही पुस्तकं संस्कारची धडे देत राहिली.तर काही पुस्तकं डोळ्यातून पाणी काढू लागली,मला प्रौढ करू लागली, समाजाबद्दल  चिंता करण्यास भाग पाडू लागली अन स्वतःला चिंतन करण्यास शिकवू लागली.
                            लहानपणापासून पुस्तकासाठी भिकारी बनत आलो.तरीही झोळी रिकामी राहतच आली.अजूनही ती भूक भागू नये व तशी भविष्यात वेळ येऊ नये असं वाटत राहतं.शेवटी पुस्तकाशिवाय जगणं म्हणजे काठीचा आधार घेत जगण्यासारखं, अंधासारखं चाचपडत जगण्यासारखं.
               ‎
     आता इथं एखाद्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे दुसऱ्या पुस्तकांवर  अन्याय केल्यासारखं,दुसऱ्या मित्राला विसरल्यासारखं.
               ‎
   पण ज्या पुस्तकानं मला आठवी किंवा नववीत(२००८) असेल तेव्हा प्रथम पुस्तकाद्वारे रडवलं होतं. एकाच रात्रीत ते उद्या मिळणार नाही म्हणून वाचून काढलं होतं. ते नंतर मला विद्यापीठासाठी अभ्यासक्रम म्हणुन आलं.ते पुस्तकं म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची " *बनगरवाडी* "
               ‎  (छायाचित्र:गुगल)    
      
     या पुस्तकानं मला काय दिलं तर असा जेव्हा प्रश्न मनात येईल तेव्हा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी शब्द असतील," *या पुस्तकानं मला माझ्या माणसांच्या व्यथाचं गाठोडं दिलं* "
                 
    या बनगरवाडीत मेंढरे राखणारे धनगर, घोंगडी विणणारे सनगर, शेती करणारे कुणबी व भटकंती करणारे रामोशी यांचा समावेश आहे.ही कादंबरी मानव-निसर्ग असा संघर्ष सांगते.म्हणून  ती वेगळी ठरते.
            
     ' _दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो'_ ,असं जेव्हा कादंबरीमधील मास्तर म्हणतो तेव्हा ते वाक्य तेवढ्यापुरत मर्यादित न राहूं देता आपल्याही जीवनप्रवासाच्या कहाणीची सुरुवात करण्यास भाग पाडतं.
             ‎
    या पुस्तकातील मास्तरकडून मला प्रामाणिकपणा,जबाबदारी पार पाडणं, गावाच्या विकासासाठी नि:स्वार्थ झटणं,प्रत्येकाचं काम आपलं म्हणून करणं, सत्य बोलणे यासारखे साधे संस्कार तो न कळत देत राहतो.
            
    ‎" _एका गावात राहून एकमेकांशी भाषा करायची न्हाई ,हे बरं न्हाई ;मास्तर!_ "असं अगतिक होऊन बोलणारा गावचा कारभारी मला समंजसपणा शिकवतो.
             
‎" _पोरं साळत आली तर त्येसनी शिकव,गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस!_ "असा मास्तराला दम भरणारा दादू बालट्या मला समाजातल्या कुप्रवृत्ती व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.
             ‎
 गावातल्या तालमीच्या उद्घाटनासाठी राजा येणार असतो.तालीम बनवत असताना "आयबू" उंचावरून पडतो.बेशुद्ध पडतो.तोपर्यंत राजा गावात येऊन उद्घाटन करून जातो.जेव्हा त्याला जाग येते तेव्हा मास्तराला म्हणतो, " _मास्तर,राजा आला का?_ " उत्तर येत ," _येऊन गेला._ "तेव्हा आयबू रडतो अन त्याच्याबरोबर आपण सुद्धा. तेव्हा त्याला आपण तालमीसाठी काम केल्याची शाबासकी नको असती तर दुरून डोळ्याने " *राजा* " कसा दिसतो ही पाहण्याची इच्छा असते.तीही त्याची अपूर्ण राहते.
             
‎या कादंबरीतील आनंदा,रामा, शेकूबा,नानी, अंजी,काकुबा ही पात्र सुध्दा खूप काही शिकवून जातात.
             
 ‎या पूर्ण पुस्तकात निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे.दुष्काळामुळे बनगरवाडीतील एक एक जण जगण्यासाठी गाव सोडू लागतो तेव्हा ते वर्णन वाचणं असह्य होतं.
             ‎" _झाडे-झुडपे वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढरानी चगळ न चगळ वेचले.फुफाटा फार झाला. चक्रीवादळे होऊ लागली, विहिरिंचे पाणी आटले. वाडीचा हेळ आटला_ ." यासारखी दुष्काळाची वर्णने वाचत वाचत स्वतः आपण मूक होऊन जातो.
             ‎
  अन एकाच गोष्टीसाठी कादंबरी  प्रेरित करत राहते , " _तू पाण्याचा प्रत्येक थेंब वाचव","झाड लाव अन ते जगव"_
             ... *पलायन न करण्यासाठी.*

(हा ब्लॉग 🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरील विषयावर लिहिला आहे)
       
               ‎
               ‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...