शिक्षणातून माणूस घडावा,माणसाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान मिळावा,मानवी जीवन स्वावलंबी व्हावे,शिक्षणातून स्वावलंबनाची प्रेरणा द्यावी हा विचार घेऊन "तुम्ही मला एक माळरान दया,त्या माळरानावर मी नंदनवन फुलवितो", असे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील.दलितांचे अश्रु स्वतःच्या पदराने पुसणारा,त्यांच्या सुख-दु:खाशी समरस होऊन ती निवारण्यासाठी कायावाचामनाने रात्रंदिवस झटणारा.शेतकरी,कामगार,शिक्षक आणि सैनिक हेच खरे देव मानून त्यांची भारतीय किर्तीमंदिरात पुनः प्राणप्रतिष्ठा करण्यसाठी आपल्या जीवाचे रान करणारा.सरकार,सावकार आणि सरंजामदार यांच्या मगरमिठीत सापडलेल्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी बद्धपरिकर झालेला,धर्माधिकाऱ्यांच्या कोंडीत सापडलेली ज्ञानगंगा सह्याद्रीचा कडा फोडून बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत आणून पोचविणारा आधुनिक भगिरथ म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील.
मनाने थोर असलेले समाजसुधारक हे समाजाचा ठेवाच मानले पाहिजेत. महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी अंत:करणपूर्वक प्रामाणिकपणे ,निरलसपणे,निष्ठेने अन निर्भयपणे विरोधाला न जुमानता स्वतः अशिक्षित असून इतरांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यास ज्यांनी आपले तन-मन-धन खर्ची घातले व ज्ञानामृत पाजले,त्या थोर व्यक्ती पैकी एक आमचे कर्मवीर आण्णा.
त्यांचा जन्म कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला.रयतेला ज्ञानामृताचा कुंभ पाजणारे म्हणून ते 'कुंभोज' या गावी जन्मले असावेत.श्रीमंताच्या सदनातून वावरणारी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत आणून पोचविणारे म्हणून ते 'गंगामाई'या महान मातेच्या पोटी अवतरले असावेत आणि भावी काळात बहुजन समाजाचा कैवारी'भाऊ होणार म्हणूनच खेड्यांपाड्यातील भोळ्याभाबड्या बायकांनी त्यांचे नाव 'भाऊराव' असे ठेवले असावे.असिम त्याग व अविश्रांत श्रम करून जी अखंड सेवा भाऊरावांनी केली त्याची आमजनतेने स्वयंस्फूर्तीने दिलेली पावती म्हणजे 'कर्मवीर' ही उपाधी होय.स्वावलंबन शिक्षण हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आत्मा होय.
बहुजन समाजाचा शैक्षणिकदृष्ट्या उद्धार व्हायचा असल्यास एकही खेडे शाळेशिवाय राहू नये,असा आण्णांचा निर्धार होता.हे शिक्षण मोफत व सार्वजनिक असावे,असे त्यांचे मत होते. म्हणून अण्णांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा प्रारंभ काले येथे सन 1919 मध्ये केला. 1938 साली व्हॉलंटरी शाळा साताऱ्यानजिक येवतेश्वर या डोंगरावर असलेल्या वाडी येथे काढण्यात आली.समाजात सुशील पत्नी,त्यागी माता आणि आदर्श शिक्षिका निर्माण करण्यासाठी 1942 साली 'जिजामाता अध्यापक विद्यालय'स्थापन करण्यात आले. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकडे अण्णांनी लक्ष वळविले. अनुक्रमे सन 1940 व 1947 या साली 'महाराजा सयाजीराव विद्यालय'व 'छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची ' स्थापना केली.आज अण्णांची रयत शिक्षण संस्था एक वटवृक्ष झाली आहे.
कर्मवीर अण्णांबरोबर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्यात मोलाचा वाटा होता.ते 'माणूस' ही जात व 'माणुसकी'हा धर्म मानणारे होते.
त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना पंजाबराव देशमुख म्हणतात की,"कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या या मानवाला जगातील विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे व कष्टाचे मूल्यमापन होणार नाही".तसेच गाडगे महाराजांनी कर्मवीर अण्णांबद्दल काढलेले उद्गार अत्यंत मार्मिक व अर्थपूर्ण आहेत,ते म्हणतात,"मी फक्त माणसांची सेवा करून त्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला.पण भाऊरावांनी प्रत्यक्ष दगडालाच जिवंत करून त्यात जीव ओतला व त्याला देवपण आणले.हीच खरी सेवा आहे;ते पुढे म्हणतात,माझ्या अंगावरील कातडी काढून त्याचे जोडे करून अण्णांच्या पायात घालण्यास दिले तरी त्यांच्या थोर उपकारांचे आपण उतराई होणार नाहीत"
कर्मवीर अण्णांबरोबर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्यात मोलाचा वाटा होता.ते 'माणूस' ही जात व 'माणुसकी'हा धर्म मानणारे होते.
त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना पंजाबराव देशमुख म्हणतात की,"कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या या मानवाला जगातील विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे व कष्टाचे मूल्यमापन होणार नाही".तसेच गाडगे महाराजांनी कर्मवीर अण्णांबद्दल काढलेले उद्गार अत्यंत मार्मिक व अर्थपूर्ण आहेत,ते म्हणतात,"मी फक्त माणसांची सेवा करून त्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला.पण भाऊरावांनी प्रत्यक्ष दगडालाच जिवंत करून त्यात जीव ओतला व त्याला देवपण आणले.हीच खरी सेवा आहे;ते पुढे म्हणतात,माझ्या अंगावरील कातडी काढून त्याचे जोडे करून अण्णांच्या पायात घालण्यास दिले तरी त्यांच्या थोर उपकारांचे आपण उतराई होणार नाहीत"
महात्मा फुल्यांनी महाराष्ट्राची खडकाळ जमीन आपल्या सत्यशोधक नांगराने नांगरली.महर्षी आण्णासाहेब शिंदे यांनी शुद्ध मानवतावाद व जहाल राष्ट्रवाद यांचा कुळव घालून ती कुळवली आणि कर्मवीर आण्णांनी त्या जमिनीत स्वावलंबनाचे खत व समतेचे पाणी घालून शिक्षणाचा सुंदर मळा पिकविला.महाराष्ट्र या महान मानवांचे उपकार कदापि विसरणार नाही.
अविरत श्रम,अपूर्व त्यागी वृत्ती,कौतुकास्पद धडाडी,दुर्दम्य आशावाद,जळजळीत कार्यनिष्ठा, लोकसंग्राहक वृत्ती,अचूक दृष्टेपणा,सत्यावर आढळप्रेम,कार्यकुशलता,विशाल हृदय,पहाडी आवाज,पोलादी शरीरयष्टी,स्पष्टवक्तेपणा आदि गुणांचा परिपाक म्हणजे कर्मवीर आण्णा.
मित्रांनो, पायात वहाणा नसतानाही,उघड्या पायांनी या पायाला कितीही चटके बसले तरी वणवण फिरणारे आण्णा ,ज्यांनी आपल्या खांद्यावर एका दीनदुबळ्या मुलाला घेऊन त्याला शाळेत आणून शिक्षणाची प्रेरणा देणारे,मुलांच्या जीवनात स्वप्नांची मशाल आणून अंधारातून प्रकाशात आणणारे आण्णा,आपल्या पायाला चटके बसले तरी मुलांच्या पायाला पोळू नये म्हणून मुलाला खांद्यावर घेणारे तसेच खांद्यावर बसलेला मुलगाही उन्हाने तापतो आहे हे समजताच त्याला उन्हातून सावलीत आणणारे कर्मवीर आण्णा.
आईप्रमाणे काळजी घेतली बहुजनांची या महामानवाने.या महात्म्याचे 9 मे,1959 रोजी देहावसान झाले.एक आकाश उजळून टाकणारा धूमकेतू बघता बघता आकाशाला दिशाहीन व अंधारमय करून गेला.प्रकाशाची रेषा जाताना मात्र उमटवून गेला.
म्हणून मित्रांनो, आज कर्मवीर अण्णांची जयंती ,आज त्यांच्या जयंतीला विनम्र अभिवादन करून आपण एवढं तरी नक्की केलं पाहिजे....
"माणसांनी खरंच कधीतरी
दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे
सुर्याएवढं जरी जमलं नसलं
ज्योती एवढं तरी जळलं पाहिजे. "
दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे
सुर्याएवढं जरी जमलं नसलं
ज्योती एवढं तरी जळलं पाहिजे. "
-©सौदागर काळे.
(काही वर्षांपूर्वी कर्मवीर अण्णांच्या कार्याविषयी बोलण्यासाठी त्यांच्या जीवनावरील पुस्तकांचा,लेखांचा संदर्भ घेतला होता.त्यातील काही मूळ वाक्ये आशय जाऊ नये म्हणून आहे तशी येथे घेतली आहेत.)(छायाचित्र सौजन्य-गुगल)