गांधी फेलोशिपचे मुख्य केंद्र राजस्थान मधील बगड (झुंझुंनू)येथे आहे. सर्व फेलो आपल्याला दिलेल्या राज्यातील लोकेशनवर येथूनच जाण्यासाठी निघतात.मला राजस्थान मधील झुंझुंनू हे लोकेशन मिळाले होते. जे गांधी फेलोशिपचे मुख्य केंद्राचे कार्यक्षेत्र आहे.जे राजस्थान मध्ये फेलो म्हणून कार्यरत आहेत त्यांना पिरामल फेलो म्हणूनही ओळखतात.
जुलै महिन्यातील सुरुवातीच्या 10-12 दिवसाचे प्रशिक्षण संपून विविध राज्यातील वेगवेगळ्या टीम दिलेल्या लोकेशनवर जाऊ लागल्या.आम्हांला झुंझुंनू जिल्ह्यातील खेतडी तालुका दिला होता.मुख्य केंद्रापासून 3-4 तासाच्या अंतरावर आहे. यासाठी आमची 7 जणांची टीम आहे.त्यात 2 पश्चिम बंगाल,2 उत्तर प्रदेश,1 गुजरात,1 दिल्ली,अन मी 1 महाराष्ट्र.त्यात पुन्हा इंजिनियर, MSW, कला ,विज्ञान क्षेत्रातील असे आमचे मिश्रण आहे.
आमची टीम
हे असे सर्वजण आम्ही .आमच्या लोकेशनवर निघालो. खेतडी हे आमचे लोकेशन 2 वर्षासाठी असणार होते त्यामुळे तिथे सर्व असेल का?तेथील लोक कसे असतील?शहर आहे की मोठे गाव आहे?आपण जिथे राहणार आहोत तेथील रूम कशा असतील?जेवण कसे असेल?असे अनेक साधे प्रश्न प्रवासात असताना पडत होते.
आम्ही मुख्य केंद्रात बगड येथे प्रशिक्षण दरम्यान राहत होतो तेव्हा जुलै महिन्यात आपल्याकडे पावसाचे वातावरण होते पण येथे मात्र उष्णता आपल्याकडच्या मे महिन्यासारखी. आम्ही जिथे राहत होतो तिथे प्रत्येक रूममध्ये कुलर ची व्यवस्था केली होती.तरीही उष्णता जाणवत असे.मग वाटायचं येथे जुलै महिन्यात एवढी उष्णता तर मे महिन्यात किती असेल?दुसऱ्या राज्यातील फेलो 10 दिवसासाठी येथे होते पण ज्यांचे राजस्थान लोकेशन होते ते 2 वर्षासाठी येथे हे सहन करत राहतील हे मनात आले की जादा घाम यायचा....
हं... आम्ही आमच्या लोकेशन खेतडीकडे प्रवास करत होतो.खेतडी 20-25 किलोमीटर उरले होते तेव्हा डोंगराच्या रांगा दिसू लागल्या.काही काळासाठी का होईना आपल्या पश्चिम घाटाची आठवण आली. त्याच्यापेक्षा हायसं वाटलं की या डोंगराच्या सानिध्यात हे शहर असेल तर येथे उष्णता कमी असणार.हे असे विचार करत असताना पावसाच्या सरीपण बरसल्या.तेव्हा खूप आम्ही आनंदित झालो कारण येथे आल्यापासून पाऊस पडलाच नव्हता.अनेक प्रश्नांचे गाठोडे घेऊन रात्री 9 च्या आसपास गाडी प्रथम थांबली मुलींची जिथे राहण्याची व्यवस्था केली होती तिथे. आमच्या 7 जणांच्या टीममध्ये 3 मुली आहेत .त्या तिथे उतरल्या.उरलेले आम्ही सर्वजण मुलांची जिथे व्यवस्था केली होती तेथे उतरलो.रूम चांगल्या होत्या. सर्व सुविधा आहेत हे बघून बरं वाटलं.
संध्याकाळी खेतडी फोर्ट वरून दिसत असलेले खेतडी शहर
भारतातातील प्रसिध्द व एकमेव तांब्याची खाण खेतडी मध्ये आहे.पूर्वी मुघल काळात चालू असलेली खाण कालांतराने बंद पडली होती.नंतर "हिंदुस्थान कॉपर लिमिटेडने" चालू ठेवली.शेखावटी प्रदेश मधील हा मुख्य प्रदेश होता.आजही उत्तर राजस्थान मधील झुंझुंनू,सीकर आणि चुरू या जिल्ह्यात अनेक शेखावटी काळातील कलात्मक नमुने दिसतात.झुंझुंनू हा जिल्हा भारतातील प्रमुख जिल्हा आहे जो भारताला मोठ्या प्रमाणात सैन्य पुरवठा करतो.
एका फेलोकडे 5 शाळा आहेत ज्या 12 वी पर्यंत आहेत.त्या शाळेतील प्रिन्सिपल, टीचर,युवक,संबंधित गावातील समाज यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळत आहे.
एका गावात गेलो.गावाचं नाव होतं,त्योन्दा.या गावातील शाळेत गेलो.त्या शाळेच्या प्रिन्सिपल यांना भेटलो.गांधी फेलोशिप बद्दल माहिती दिली.पिरामल फाउंडेशन बद्दल माहिती दिली.देशातील शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणण्यासाठी आम्ही फेलो एक माध्यम म्हणून काम करत आहोत,तरी या शाळेवर काम करण्यास संमती द्यावी.अशी विनंती केली.पण ते प्रिन्सिपल ऐकून घेण्यास तयार नव्हते.तुम्ही आमच्या शाळेवर काम करू शकत नाही.आमचे शिक्षक समर्थ आहेत.तुमची गरज नाही.असे बोलत राहिले.पुन्हा त्यांचे मन वळवण्यासाठी पुन्हा शाळेला भेट दिली.पण त्याचा उपयोग झाला नाही .शेवटी ते आम्हाला तुम्ही आंतकवादीही असू शकतात.माझ्या शाळेत प्रवेश करण्यास तुम्हाला अधिकार नाही.अशा चर्चाहीन बातचीत वर येऊन ते ठेपले.अशावेळी जबरदस्तीने काम करण्यात अर्थ नाही,असे समजून घेतले.ते प्रिन्सिपल शाळेच्या विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काही बाबतीत का होईना, अडसर ठरले होते.
पहिले दोन आठवडे आमची टीममधील एक -एक फेलो अशा उच्च माध्यमिक शाळेना भेट देत असे.प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असायचा.काहींना खूप आदर मिळत असायचा,तर काहींना निराशा हाती पडत असायची.पण कोणीच नकरात्मक सूर काढत नसे.कारण आपल्या देशातील शैक्षणिक अवस्था आजही पारंपरिक मनाची आहे.बदलण्यास वेळ लागणार हे मनात प्रत्येकाने बिंबवले आहे.
नुकतेच एका केंद्रीय मंत्र्याने वक्तव्य केले की,शाळेनी सरकारकडे मदत मागू नये.असा बोलण्याचा त्यांचा सार होता.पुन्हा त्यांनी या बाबतीत घुमजाव केले तो भाग वेगळा.शाळा शासनाच्या मदतीवर चालतात.ती मदत मिळायला हवी.पण थोडा आपण विचार केला तर शाळा सुविधापूर्ण व गुणवत्तापूर्ण व्हायचे असतील तर गावातील लोक तेवढेच भागीदार असायला हवे जेवढे शासन असते.या भागातील भरपूर शासकीय शाळा गावातील लोक सुविधापूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.मदत तटपुंजी का असेना पण त्या संबंधित शाळेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.नाहीतर आपण हे..शासनाचे आहे चला फोडून -तोडून-फाडून टाकू असे विचार कृतीत आणत राहतो. हे बंद करण्यासाठी लोकसहभागातून शिक्षण खूप गरजेचे आहे.
टीमने शाळेच्या वर्गखोल्यात अशाप्रकारे लावलेले TLM
येथे प्रत्येक शाळेत दक्षिणा पेटी(अक्षय पेटीका) ठेवली जशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंदिरात आहेत.या शाळेतील दक्षिणा पेटी स्कुल कमिटीच्या समक्ष प्रत्येक अमावस्येला उघडली जाते.त्यातील पैशातून शाळेचे कामे होतात.यात विद्यार्थीही आपल्या परीने पैसे टाकतात.याबाबतीत घडलेली घटना मला खूप आवडली.खरंतर देशातील प्रत्येक शाळेने आदर्श घ्यायला हवा.तर मी नेहमीप्रमाणे माझ्या 5 शाळेतील एक शाळा -राजकीय आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय,माधोगढ.येथे सकाळी प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर गेलो होतो.(सध्या येथील शाळांचे वेळापत्रक 8:05 ते 2:10 आहे) प्रार्थना मधील राष्ट्रगान,गायत्री मंत्र,GK प्रश्न-उत्तर,योगा हे पार पडले.त्यानंतर प्रिन्सिपल सागरमल गुर्जर यांनी शाळेतील एका मुलीचा वाढदिवस होता,तिचे नाव घेतले.तिचे नाव घेताच ती पुढे आली.तिला सर्वानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर तिने तिच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या दक्षिणापेटीत 100 रुपयांच्या नोटांत पैसे टाकले.इथे ही बाब अनेकांना आदर्श निर्माण करून गेली.ज्या वयात आकृतिबंध नसलेली मौजमजा करायची सोडून हे संस्कार मिळत असतील तर ते खूप समाजाच्या जडणघडणीस आकार देत राहतात.आपल्या दृष्टिकोनातून कदाचित ही बाब गौण असू शकते पण तिथे त्या मुलीचे विचार उच्च होते.दक्षिणा पेटींची योग्य जागा कुठे असायला हवी!त्याचे हे एक उदाहरण.आपला पैसा कुठे दान करावा, गुंतवणूक करावा.ही समज आजही बहुतांश जणांना देशाचे शिक्षणक्षेत्र देऊ शकले नाही.हे तेवढेच सत्य आहे.....
Continue……….