....अन स्वप्नांचे पंख छाटत राहते

....अन स्वप्नांचे पंख छाटत राहते.

मध्यरात्री गावच्या शांततेत
कुत्र्यांचे भुंकणे ,
मांजरांनी दबक्या पावलांनी
शिकार शोधणे,
अन माणसांचे घोरणे.
ठरल्याप्रमाणे रोज घडत राहते.

अनोळखी दावणीस बांधलेल्या
बकऱ्याचा बे बे असा आर्त आवाज
उपाशीपोटी असलेल्या
कुत्र्याचे भीतीदायक रडणे,
आईच्या कुशीत निजलेल्या
बाळाचे आकस्मिक रडणे.
हे अंधाऱ्या भुडुक गावात
गाढ झोपलेल्याना जाग आणत राहते.

सारं काही शांत असताना
झाडावरची वाळलेली पाने
अलगद खाली पडत राहतात.
पण दुरून कुठूनतरी कानी पडणारा
टाळ-मृदंगाचा स्वर,
खोकणाऱ्या म्हाताऱ्यास
दिलासा देत राहतो.

अशा भयाण काळोखात
नजर रोखून बघणारे घुबड
पांघरूण घेण्यास भाग पाडते.
तेव्हा मिटलेल्या डोळ्यातला
काळोखसुद्धा ओळखीचा राहत नसतो.

रात्र पुन्हा गाढ झोपेत घोरत राहते,
........अन स्वप्नांचे पंख छाटत राहते.

©फिरस्ती.

http://firstisk.blogspot.com

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...