इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र,नवी दिल्ली व संपूर्ण बांबू केंद्र,मेळघाट यांच्या संयुक्तपणे संपन्न होत असलेल्या
हुनर खोज यात्रेत राजस्थान, आसाम,मेघालय या राज्यांत दिनांक 10 ते 25 नोव्हें,2017 या कालावधीत सहभागी झालो होतो. त्यातील राजस्थान मधील क्रमिक लेखमालिका एकत्रित देत आहे.
*हुनूर खोज संवाद यात्रा .*
_विचारातून कृतीकडे..._
*दि:09-11-2017*
कर्णाल(हरियाणा)या थोर योद्धा व दानवीर कर्णाच्या भूमीतून घरी येऊन एक आठवडा झाला असेल. नंतर एके दिवशी ऋषिकेश सरांचा फोन आला. मी 15 दिवसांच्या हुनूर खोज संवाद यात्रा संशोधन प्रवासासाठी जात आहे आणि या प्रवासात तुम्ही माझ्या टीमचे सदस्य असणार आहेत.त्यासाठी तू तयारीत रहा.प्रवासात नॉर्थ व नॉर्थ ईस्ट चे राज्ये असतील.ही अशी प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बुकिंग केलेल्या सोलापूर ते नागपूर या ट्रॅव्हल्स प्रवासाने सकाळी नऊ च्या दरम्यान (10नोव्हें)संत्रा सिटी व जगाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आपल्या राज्याच्या उपराजधानी नागपूरला पोहचलो.
हरियाणा मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांचे खूप मार्गदर्शन व साथ लाभली होती पण त्यांची इतक्या लवकर भेट या निमित्ताने होईल असं कदापीही वाटलं नव्हतं पण त्यांनी ती घडवून आणली.
नागपुरात आल्यानंतर वेळचे काटेकोर नियोजन करत त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रो.डॉ.अशोक जी नेने यांच्याशी भेट घालून दिली.ते निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या घरी अनेक प्रकारचे प्रयोग करत आहेत.कचऱ्यातून कला व इंधन यांचे प्रयोग पाहायला मिळाले.या सगळ्यात डॉ.नेने व ऋषिकेश सर करत असलेले बागेतील वृक्षाच्या पान व लाकडापासून शास्त्रीय पद्धतीने कोळसा निर्मिती व त्या कोळश्यापासून औषधी निर्मिती करत आहेत. जी महत्वाच्या आजारांवर उपयोगात येते. अर्थात ही पद्धती जनसामान्यांना उपलबध्द होण्यास अवकाश आहे, यावर यशस्वी प्रयोग हे गुरु शिष्य करत आहेत. विविध प्रकारच्या वनस्पती जोपासण्याचा व त्यांचे औषधी व जैविक गुण अभ्यासून त्यावर संशोधन करण्याचा आगळा वेगळा अनाकलनीय यशस्वी प्रवास हे करत आहेत. हे लोक करत असलेल्या टाकाऊ कचऱ्यापासून कोळसा निर्मित करण्याचे काम भविष्यात कचरा व्यवस्थापनाचा उत्तम मार्ग असल्याचे आपल्याला दिसेल.आज या निमित्ताने मला डॉ.नेने सरांच्या रूपाने एका तरुणाची ओळख झाली. त्यावेळी शासनाची तरुणांची वयानुसारची व्याख्या किती संकुचित आहे.असं वाटल्याशिवाय राहवलं नाही.
नागपूर ते जयपूर या प्रवासातील ट्रेनच्या वेळेपर्यंत अकोल्यावरून ऋषिकेश सरांचे मित्र व 'समर्पण प्रतिष्ठानचे' अध्यक्ष अमोल दादा मानकर हे यात्रेत सामील झाले.जेवण करत करत त्यांची व त्यांच्या प्रतिष्ठानच्या कार्याची प्राथमिक ओळख झाली तसेच युवा मेळघाट बरोबर समर्पणच्या जडण घडण मध्ये ऋषिकेश दादा चा सर्व नियोजन,मानस शास्त्रीय संशोधन व समुपदेशसन मॉडेल तयार करण्याचे कार्य याची वेगळी ओळख झाली.सर्व तयारी करून आम्ही तिघेजण हुनर खोजच्या अंतिम प्रवासास नागपूर रेल्वे स्टेशनवरून निघालो.
ट्रेनमध्ये विविध विषयांवर व भविष्यातील नियोजनावर आमची चर्चा होत राहीली .शेवटी कारागीर व शेतकरी या संवेदनशील विषयावर चर्चा झाली,तसेच या विषयावर भविष्यात संपूर्ण भारतवर्ष मध्ये कार्य करण्याची रूपरेखा आखली.
एवढा सारा दिवसाचा दिनक्रम सांगितला पण आम्ही करत असलेल्या 'हुनर खोज संवाद यात्रा' विषयाची संकल्पना स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे.पण त्यासाठी तुम्हाला उद्याच्या पोस्टची प्रतीक्षा करावी लागेल.
या यात्रेतील पहिलं राज्य राजस्थान.हे राज्य देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य.हे राज्य महाराणा प्रताप व रजपुतांचा गौरवशाली इतिहास,परंपरा सांगते.सध्याची ओळख सांगायची झाली तर आपल्या महाराष्ट्रातील 'नमामी चंद्रभागा'या योजनेतून नदीच्या संवर्धनासाठी झटणारे राजेंद्रसिंह राणा यांचे हे राज्य.या राज्यातील विशेष गोष्टी रोज सांगत राहणारच आहे.
..पण आता ओढ लागली आहे.देशाचे "गुलाबी शहर" म्हणून ओळख असलेल्या जयपूर सिटीत पाऊल टाकण्याची अन तेथील गुलाबी थंडी अनुभवण्याची...(क्रमश.)
*11-11-2017*
हुनर खोज संवाद यात्रेच्या अंतिम पर्वातील आज पहिला दिवस .सकाळी तिघेजण आम्ही गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूर मध्ये उतरलो.जयपूरहून जवळच असलेल्या अजमेर येथे आलो .
येथील वृत्तांत सांगण्यापूर्वी हुनर खोज संवाद यात्रा म्हणजे काय?असा तुम्हाला कदाचित प्रश्न पडलेला असू शकतो .नवी दिल्लीचे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, मेळघातील संपूर्ण बांबू केंद्र, ग्राम ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हुनर खोज संवाद यात्रेचेआयोजन केले आहे.
आजपर्यंत आपला एक समज होत राहिला कि आपल्या देशातील विविध क्षेत्रांचा आविष्कार फक्त विज्ञानाच्या,औद्योगिक यंत्राच्या साहाय्याने होतो. आपली अर्थव्यवस्था सुद्धा या क्षेत्रांनाच प्राधान्य देत राहिली.पण प्राचीन काळापासून चालत आलेली आपल्या देशाची वैशिष्ट्य असणारी बारा बलुतेदारी पद्धत काळाच्या ओघात जागतिकीकरणामुळे मरणासन्न झाली.तिची अवस्था वस्तुविनिमयाच्या नजरेच्या व्यतिरिक्त तिच्यातील उद्योगता आपण ओळखू शकलो नाही.त्यामुळे आजही आर्थिक मंदी आली तर फक्त देशाला लघुउद्योग तारू शकतात,मोठे उद्योग नाही.हे सत्य आपण नाकारून चालणार नाही.
तरीही आपल्या देशात अनेक ठिकाणी मूलनिवासी समाज बांधवांनी आपल्या उदरनिर्वाह साठी काळानुरूप आपल्या कलेत बदल करत राहिले,पण याकडे सरकारचे लक्ष अंधत्वाच्या नजरेसारखे राहिले.त्यांच्यातील कारींगरी,कला,संस्कृती यामधील विविधता जतन करणं हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.म्हणून हुनर संवाद यात्रेच्याे माध्यमातून अश्या पडद्यामागच्या करिगारांना भूमिकेतून पडद्यावर आणणे,भविष्यात सुद्धा तरुणांनी यांचा आदर्श घेऊन ही परंपरा पुढे न्यावी म्हणून हुनर कारागिरांना राष्ट्रीय मंचावर सन्मानित करणे हा आहे.
आज समाजात सन्मानपूर्वक करिगारांचा पुनस्थापणा करण्यासाठी शास्त्रीय संशोधन करण्याचे काम मा.श्री. रवींद्र शर्मा (गुरुजी)कला आश्रम अदिलाबाद,यांच्या प्रेरणेने सौ.निरुपमाजी व श्री.सुनीलजी देशपांडे (कुलगुरु ग्राम ज्ञानपीठ,कोठा मेळघाट)यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने श्री.ऋषिकेश खिलारे मानस शास्रज्ञ, मेळघाट यांच्या नेतृत्वाने जानेवारी 2017 पासून भारतवर्ष मध्ये चालू आहे.
थोडक्यात,आपली भारतीय संस्कृती आणि त्यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी हुनरी कारागिरांचा शोध घेणे म्हणजे हुनर संवाद यात्रा होय.
अजमेरला येथील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ऋषीउद्यान च्या पवित्र भूमीमध्ये निवास केला.
या भागातील छोटेलाल बिलास प्रसाद या हुनर व्यक्तीला भेटलो.ते सरकंडे नावाच्या घासापासून बसण्यासाठी खुर्च्या बनवतात.हे गवत अजमेर ते भरतपूर भागात मोठ्या प्रमाणात मिळते .त्याचं वैशिष्ट्य...
1.पूर्ण पने नैसर्गीक साधनसामग्री पासून बनवली जाते.
2.या कामासाठी कुठल्याही प्रकारच्या यंत्राचा वापर करता येत नाही.
3.काही परदेशी कंपनीने याचा मोठा प्रयत्न केला पण तो फसला.
3.हे उन्हाळ्यात थंड व थंडीत गरम राहते.यासाठी विशिष्ठ प्रोसेसिंग केली जाते.
4.आपण कितीही वेळ बसलो तरी थकवा जाणवत नाही.
यासाठी फक्त 4 औजारांचा वापर केला जातो.
नंतर राष्ट्र निर्मिती साठी युवकांची भूमिका या विषयी अजमेरमधील तज्ञ व्यक्तीशी बैठक झाली यात काही सन्मानीय व्यक्ती हि उपस्थित होत्या.आज एवढंच.(क्रमशः)
*12-11-2017*
*या* डिजीटल युगात काही गावं गुगल च्या मॅपवर येत राहिली पण भारताच्या भूगोलातून मात्र अंधूक होत चालली .शरद जोशींच्या इंडिया आणि भारत संकल्पनेला पूर्णत्व प्राप्त होत राहिले. पण हे अंतर कमी होण्यासाठी वेगाने वाढणाऱ्या इंडियाला अजूनही भारताकडे पाहायला वेळ नाही .याचं मात्र दर्शन जागोजागी होत राहिले.
आज आम्हाला एका दिशेचा शोध नव्हे तर एका आदिवासी गावाचा शोध घेत प्रवास करायचा होता. सकाळी सात वाजता अजमेर येथून फोर व्हीलर च्या माध्यमातून बाहेर पडलो अन सुरू झाला आमचा हुनरी कारागीर च्या गावाच्या शोधात.
अजमेर मधून बाहेर पडताना या शहरातील विविध प्रकारचे निर्माण झालेले महाल,उंचावरील घरे भुरळ पाडत होते. पण आम्ही पर्यटनास आलो नसल्याने दुधावरची तहान ताकावर भागवत आम्ही पुढचे ठिकाण गाठत होतो.
अजमेर ते चित्तोडगढ रस्त्याच्या दरम्यान वेडी बाभूळ(चिलार)मोठया प्रमाणात दिसून येत होती याचा सरळ अर्थ निघतो हा पट्टा पाण्याच्या कमतरतेने ग्रस्त असावा.
आम्ही चित्तोडगढ किल्ल्यावर गेलो ते फक्त संग्रहालय पाहण्यासाठी व पुरातत्व अध्ययनासाठी पण तिथे गेल्यावर कळले की ते गेली दोन वर्षां पासून बंद आहे म्हणून आम्हाला ते पाहता आले नाही तेथे मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी केली .पण या किल्ल्यावर खूप मोठी वस्ती आहे,बाजारपेठ आहे,महाल आहेत ते आहे तसेच आहेत.आपल्या पूर्वजांचा वारसा जतन करण्यात व पर्यटकांस दाखवविण्यात राजस्थान सरकार सजग आहे.हे दिसून आलं.आपल्या महाराष्ट्रातील किल्यांची अवस्था पाहिली की वाटून राहतं शिवाजी महाराज फक्त राजकारणासाठी आपल्याला हवेत.त्यांची शौर्यगाथा जगाला सांगण्यासाठी खूप आपण उदासीन आहोत.या अशा गोष्टी खूप आहेत तुलना करण्यासारख्या.
प्रवास करताना जागोजागी रस्त्यावर टोल भरताना खूप वैताग आला ,अशावेळी आपल्या राज्यातील टोलनाक्याविरुद्ध भान असलेले नागरिक यांचे कौतुक वाटले.दुसरं म्हणजे रस्त्यावरील खड्डा हा आपल्या राज्यातील प्रश्न नाहीतर देशातील अर्थव्यवसस्थेला पडलेला खड्डा आहे. मग असे खड्डे राजस्थान मध्ये सुद्धा आहेत.राजस्थानची वसुंधरा बघता बघता वसुंधराराजे यांचा कारभार सुद्धा समजला.प्रश्न सरकारचा,प्रशासनाचा नव्हे तर राजकारणाचा धंदा केलेल्या मनोवृत्तीचा आहे.या अशा गोष्टी खूप आहेत पण ही वेळ नाही इथं सांगण्याची.
पुढे आम्हाला मानपूर या आदिवासी गावात जायचं होतं.हे गाव झल्लार या मोठ्या गावाशेजारी आहे.जवळून उदयपूरला जाणारा मार्ग जातो.या गावाकडे येताना निसर्गाचे सौंदर्य दिवसभराचे 400 किलोमीटरचा थकवा दूर करत होता. या मानपूर गावाकडे जाताना मोर, नीलगाय ,विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी,राजस्थानी पेहराव केलेले माणसे यांचे दर्शन होत गेले.
सकाळी सात वाजता निघालेलो आम्ही रात्री आठ वाजता जिवीतराम ढोली यांच्या घरी पोहचलो.रात्री यांच्याच घरी मुक्काम करणार असल्याने आम्ही त्यांच्याशी येथील आदिवासी लोकांच्या परंपरा, त्यांचे प्रश्न यावर मनसोक्त चर्चा केली.तसेच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संगीताची धून पावा(बासुरी)च्या माध्यमातून वाद्य वाजवत चर्चेत रंगत आणली. यांच्याबरोबरची सविस्तर चर्चा भविष्यात वेगळ्या रुपात देणार आहोतच.
एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा,आपुलकी,प्रेम,माणुसकी सद्या संपत चालली.पण आदिवासी समाजाने आजही हे जिवंत ठेवले." *कुत्र्यापासून सावध रहा"* अशी घरासमोर पाटी लावणारे आम्ही आदिवासी गावातील जीवतराम ढोली यांच्या घरी आल्यानंतर भिंतीवर एक वाक्याने स्वागत केलं ते वाक्य होते " *अतिथी देवो भव:"*
भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नेमकं कोणी बदलायला हवं ,भविष्यातील योजना,समाजातील संस्कार,संस्कृती,सभ्यता यावर विवेचन करत गावकऱ्यांशी ऋषिकेश खिलारे व अमोल मानकर यांनी चर्चा केली.येत्या काळात देशाची विरासत संवर्धनासाठी कार्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक विषयावर चिंतन करत भविष्याचा विचार करतच आम्ही झोपी गेलो.....(क्रमशः)
13-11-2017
(चौथा दिवस)
पहाटे पासून सुरू झालेली गार वाऱ्याची झुळूक झोपलेल्याना जाग आणत आहे,
काहीजण पहाटे उठून सूर्य उगवायच्या आत अंघोळ करत आहेत, कोंबडयाचे आरवण्याचा आवाज कानावर ऐकू येतो आहे;तरीही त्यानं अलार्म सारखं सतत ओरडावे पण आपण झोप मोड झाली म्हणून आपण तो बंद करू नये असं वाटत राहतं ,
पक्ष्यांचे फडफडणे, चिवचिवणे,ओरडणे हे कोणत्याही सुमधुर संगीतापेक्षा कमी नसलेला आवाज व गुरांचा घंटानाद सकाळ अजून भक्तिमय करत होती, झोपलेल्या बाजेवरून तोंडावरचे पांघरूण काढताच हे निसर्गाचे विलोभनीय, अतुलनीय दर्शन पाहताच तुकोबांच्या "वृक्षवल्ली आम्हां सोयरे ,वनचरे" या पंक्ती आठवत राहिल्या. हे सारे वर्णन मला पडलेल्या साखरझोपेचे नाही तर राजस्थान मधील मानपूर या आदिवासी गावातील आहे.
मानपूर या गावात आम्ही हुनर खोज संवाद यात्रेच्या निमित्ताने रात्री मुक्काम केला होता.सकाळी आम्ही गावातील सीतामाई नावाच्या तलावात अंघोळ करण्यासाठी गेलो.तेव्हा काही आदिवासी महिला जंगलातून लाकडाच्या मोळ्या घेऊन सकाळी सकाळी घेऊन घराकडे येत होत्या.त्यांचे हे कष्ट वाताणूकीत घरात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना ,राज्यकर्त्यांना कसे समजणार. हे गाव विविध साधनसंपत्तीने परिपूर्ण आहे.सागवान,पळस, लिंब,माड,बांबू,खजूर यासारखे वृक्ष तर सिंह, चित्ता, कोल्हा, नीलगाय,यासारखे प्राणी.जिप्सम,ग्रॅनाइट, संगमरवरी दगड अशी खनिज संपत्ती आहे.येथील आदिवासी लोक वागडी बोलीभाषा बोलतात.विशेष म्हणजे येथील रस्ते निवडुकांच्या कुंपणाने बंदिस्थ आहेत.
सकाळी आम्ही एका बांबूपासून विविध प्रकारच्या टोपल्या बनवणाऱ्या एका आदिवासी आजोबांकडे गेलो.त्यांच्याकडे टोपल्या बनवण्याचे उत्कृष्ट कला आहे.गावातील मागणीनुसार बनवत राहतात.त्यांच्याकडून एक समजले की,सरकारने जंगलातील बांबूवर उपजीविका करणाऱ्या आदिवासीवरील बांबू तोडण्याच्या प्रकियेवरची बंदी उठवली असतानाही स्थानिक अधिकारी त्यांना त्रास देतात.त्यांना अजूनही माहीत नाही की सरकारने आपल्या फायद्यासाठी असा एक निर्णय घेतला आहे.ज्या सरकारच्या निर्णयांवर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न अवलंबून आहे .असे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात सरकार उदासिन आहे,एवढं मात्र खरं.
आपल्या कोकणात किंवा आजही काही शहरात कौलांराचे घरे आहेत.पण आम्ही असे काही वेगळ्या व पूर्वजांपासून चालत आलेले, तेथील मातीपासून हाताने बनवलेले प्रत्येक घरावर असलेले कौलारू पाहिले.ते बनवणाऱ्या उदयलालजी मीना यांच्याकडे गेलो.त्यांनी या कौलांराचे असे वैशिष्ट्य सांगितले:
1) हे गावातील मातीपासून तयार
केले जातात.
2)हे बनवताना कोणताच साचा
वापरला जात नाही.
3)त्यांचा एक दावा आहे की,सिंमेंटपासून बनवलेल्या घरात काही काळाने पाणी झिरपेल पण यातून नाही.
4)150-200 वर्षांपासून हे कौलारू आजही टिकाऊ स्वरूपात आहेत.म्हणजे हे दीर्घकाळ टिकू शकतात.
असे काही गावातील हुनर कारागीर लोकांना भेट दिली.या गावात अजूनही निरक्षरता आहे तिथं गाव कसं होणार कॅशलेस?येथे लोक निरक्षर असूनही ,कोणती जाहिरात सरकारकडून नसूनही, मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे.हे विशेष.
सलीला,सोम,माही या त्रिवेणी संगम असणाऱ्या नदीच्या ठिकाणार जाऊन आलो.दिवाळीच्या वेळी आपण ' *इडा पिळा टळू दे,बळीचं राज्य येऊ दे'* असं म्हणत असतो. त्याच बळीराजाला ज्या वामनाने पाताळात गाडलं त्या ठिकाणावरून आलो.अन आजही देशातला बळीराजा पाताळात आहेच फक्त ठिकाण गाडण्याचं देशव्यापी झालं आहे.(क्रमशः)
*दिवस पाचवा*
(14-11-2017)
काल मानपूर या गावातून थेट उदयपूरला आलो.उदयपूर शहरालाच सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते.उदयपूरची शहराची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व त्यांनीच मेवाड प्रांताची राजधानी चित्तोडगढहून येथून उदयपूरला हलवली.तेव्हापासून हे शहर ऐतिहासिक वास्तू व परंपरेने ओतप्रेत भरलेले आहे.येथील पिछोला सरोवरावरात बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) हे पाहण्यासाठी अनेक विदेशी येथे आलेले दिसतात.ही या शहराची थोडक्यात माहिती.
आज आम्ही प्रथम गेलो दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे नवलखा येथील असलेल्या वस्तुसंग्रालय या ठिकाणी. येथील वस्तुसंग्रालय पाहताना काही गोष्टी वेगळ्या समजल्या.रामायण घडले आहे की नाही हा मुद्दा बाजुला ठेऊया.आर्य समाजाचे म्हणणे आहे की," *हनुमान की पुंहछ(जशी आपली दिल्लीपर्यंत ओळख असती तशी) बहुत उपर थी| लेकीन सीरियल और कुछ लोगोने 'पुंहछ'का 'पुंछ' करके हनुमान को पुंछ लगा ली* |" तसेच एखाद्याने आपला चार माणसात अपमान केला तर आपण म्हणतो,"याने माझं सर्वांसमोर नाक कापले."असंच रामायणातील शर्पणकाच्या बाबतीतही असंच घडलं असावे पण काही लोकांनी सीरियल,कथेमधून तिचे खरे नाक कापलेले दाखविले.या अशा काही गोष्टी नवीन समजल्या.
येथून आम्ही सिटी पॅलेस कडे गेलो.सिटी पॅलेसचे भव्य दिव्य बांधकाम पाहून मन हरखून गेले,कडेने असलेले सरोवर या पॅलेसला अधिक सौंदर्यवान बनवते.या पॅलेस मध्ये प्रवेश करताना भलेमोठे प्रवेशद्वार स्वागत करते.या महालात राजपुतांचा इतिहास खूप ताकदीने सर्वांसमोर जिवंत केला आहे. अन आंम्ही शिवाजीमहाराजांचा व महाराष्ट्राचा इतिहास स्वतः मध्ये वाटून घेतला.या महालात पुरातन तलवारी, राजपूत घराण्याचा या महालाशी असलेला इतिहास, भाले, प्राचीन भांडी,भिंतीवरील नक्षीकाम, पद्मावती राणीचा इतिहास,नजराणा म्हणून राजांना दिलेल्या वस्तू,घोड्यांच्या प्रतिकृती, हत्तीसाठी बनवलेल्या जागा,वीस्तर्ण जागेत पसरलेला हा महाल,या महालातून दिसणारे मनमोहक उदयपूर शहर.हे सारं पाहिल्यानंतर इतिहास बद्दल असलेली सांगड अजून मजबूत होते;सिटी पॅलेस सारखी.
दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही पोहचलो 'महाराणा प्रताप गौरव संग्रहालय'मध्ये.इथं महाराणा प्रताप यांचा सर्वात वजनी पुतळा डोंगरावर बसवलेला आहे. त्याच्या पायथ्याशी निर्माण केलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे संग्रहालय मध्ये गेलो.यामध्ये पेंटिंगच्या साहाय्याने दाखवलेला इतिहास,रोबोटीक पद्धतीने घडवलेले महाराणा प्रताप यांच्या काळातील संवाद,शिल्पकलेतून दाखवलेले लढाईचे दृश्य, अजून भरपूर काही पाहण्यासरखं आहे.
एक गोष्ट सांगायची राहून गेली होती.सध्या इथं भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावरून सर्वत्र वाद व विरोध चालू आहे.आम्ही काही जणांची यावरची प्रतिक्रिया विचारली असता त्यानी या इतिहासाच्या विकृतीपणाचा व चित्रपटाचा निषेध केला.यावरून एक समजलं की,एखाद्या कार्यासाठी वेडी झालेली माणसं इतिहास घडवून जातात अन दीडशहाणी माणसं आपल्या सोईनुसार इतिहास बदलत राहतात....
(क्रमशः)
*दिवस सहावा(15 नोव्हें,2017)
आज राजस्थान राज्यातील शेवटचा दिवस.जयपूर येथून प्रवासाला सुरूवात करत करत अजमेर-भीलवाडा-चित्तोडगढ-वल्लभनगर-सल्लूम्बर-जलारा-उदयपूर.पुन्हा उदयपूर येथून खैरवाडा-कोटडा-विकरिया-हल्दीघाटी-नाथद्वार-भीम-अजमेर.असा 1200 किलोमीटरचा प्रवास 12 ते 15 नोव्हेंबर असा केला.या दरम्यान NH
NH-76, NH-8 या राष्ट्रीय महामार्गांचा संपर्क आला.यातील NH-8 हा देशाचा स्वर्निम चतुर्भज महामार्ग आहे,जो देशातील प्रमुख चार शहरांना जोडतो.त्यात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता व चेन्नई या शहरांचा समावेश आहे.या प्रवासाविषयी नंतर सविस्तर लिहिणारच आहे.तूर्तास हे एवढंच.
आज आम्ही उदयपूर येथून खैरवाडा, कोटडा या भागाकडे गेलो. महाराणा प्रताप यांना लढाईच्या वेळी भिल्लांनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती . ते भाले निर्माण करत असत.त्यांचे वंशज शोधत या भागात प्रवास केला. काही जणांना आम्ही भेटलो.पण आज सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने भाले निर्माण करण्यावर बंदी घातली आहे.ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
खैरनार येथे देशातील एकमेव भिल्ल समाजाचे रेजिमेंट आहे.तिथे आम्ही भेट दिली. तेव्हा त्यांचा देशाच्या बलिदानसाठी केलेल्या स्मृतींना संग्रहालयच्या माध्यमातून उजाळा मिळाला.
या भागाकडे प्रवास करताना सोम नदीचे पात्र आणि खोरे पाहायला मिळते.याच भागात ऋषभदेव येथे तिचा उगम होतो.येथील परिपूर्ण निसर्ग पाहताना व घाटातून प्रवास करताना आपल्या कोकणची आठवण आल्याशिवाय राहवत नाही.या दरम्यान वन्यजीव फुलवाडी अभयारण्य आहे.ते गाडीच्या खिडकीतून बघताना खूप प्रसन्नता आणते.
नंतर हल्दीघाटी या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही गेलो. हा परिसर अरवली पर्वतरांगेत येतो.इथली माती हळदी सारखी आहे म्हणून या घाटाला 'हल्दीघाटी'नाव पडले.इथं महाराणा प्रताप व अकबरांचे सरदार यांच्यात 18 जून 1576 मध्ये घनघोर युद्ध झाले होते.त्यात महाराणा प्रताप यांचा विजय झाला पण त्यांचा प्रिय चेतक घोडा मारला गेला .आज इथं या आठवणी जागवण्यासाठी सरकारने मोठे संग्रहालय उभारले आहे.
या भागात प्रवास करताना काही हुनर कारागिरांना शोधावे लागत रोज सरासरी 300 किलोमीटरच्या आसपास फोर व्हीलर च्या माध्यमातून आम्ही प्रवास करत होतो.एकवेळ अशी आली की,गाडीतील डिझेल सोम नदीच्या परिसरात संपले .हा भाग दरी असलेला,मोबाईलला इथं रेंज नाही.पुढे 15 किलोमीटर अंतरावर गेल्यावरच डिझेल टाकता येणार होते.आम्ही काही क्षण हतबल झालो होतो पण एका गुजरातच्या टेंम्पोचालकाने दिलेल्या डिझेलच्या मदतीने आमचा प्रवास सुखकर झाला.काही वेळा टायर सुद्धा पंक्चर झाले परुंतु हा हुनर खोजचा प्रवास डॉ. ऋषीकेश सर व अमोल मानकर दादा यांच्या अविरत सकारात्मक ऊर्जेने पुढे चालूच राहिला.
रात्री उशिरा आम्ही अजमेरला पोहोचलो. राजस्थानच्या ठरवलेल्या काही जिल्ह्यातील खोज यात्रा संपली होती.
पण खरी खोज यात्रा उद्यापासून(16 नोव्हें) आमची चालू होणार आहे.पूर्वेकडील राज्यांत जाण्यासाठी दिल्लीतून निघणाऱ्या ब्रम्हपुत्रा एक्स्प्रेसचा 40 तासांचा प्रवास करावा लागणार आहे.त्यासाठी न थकता आम्ही सज्ज आहोत.
थोडक्यात;"इथे थांबणे नाही..."
(क्रमशः)
# *दि 16 व 17 नोव्हेंबर 2017*
*कॅशलेस भारतासाठी हेल्पलेस -*
आम्ही 5 दिवस हुनर खोज यात्रेच्या निमित्ताने राजस्थान राज्यातील हुनरी कारागिराच्या शोधात फिरत होतो. या प्रवासात अनेक धोकादायक क्षेत्रातून रात्रीचा प्रवास करताना जास्त रोकड जवळ ठेवणे धोक्याचे होते .तशा स्पष्ट सूचना स्थानिकांनी दिल्या होत्या. नोटाबंदीनंतर सरकारच्या प्रदशित होणाऱ्या कॅशलेस नीतीवर विश्वास ठेऊन ऋषिकेश सरांनी जवळ आवश्यक रोकड ठेवणे हितकारक आहे असे ठरवले.
मग जेव्हा गाडीत पेट्रोल टाकायची वेळ येत असे,तेव्हा पेट्रोल पंपावर मशीनची सोय नसल्याने जेवढे उपलब्ध रोकड असे तेवढेच पेट्रोल टाकावे लागत.त्याचा फटका ग्रामीण भागात खूप बसला.राष्ट्रीय, राज्य मार्गावर एकही टोलनाकाधारक कार्ड ने पैसे स्वीकारत नव्हता मशीन होत्या पण बंद आहे ही कृत्रिम बंदी लक्षात येत होती पण वेळ व ध्येय स्पष्ट होते.एका तर टोल नाक्यावर स्पष्ट लिहिले होते, " _इथं फक्त रोकड स्वरूपात पैसे स्वीकारली जातील._ " प्रचंड खड्डे असणाऱ्या रोडचा टोल मोठया प्रमाणात आम्ही भरत होतो हि खंत होती पण...
जेव्हा आम्ही ATM कडे जात तेव्हा समजायचे काही कारणास्तव ते बंद आहे.जेथे चालू असत तिथं रेशनला जशी रांग लागते तशी रांग असायची.याचा फटका ऋषिकेश सरांना असा बसला की, दहा हजार मशीनने हातात न देताच," *तुम्ही अकाऊंट मधुन पैसे काढले असा दर्दभरा मॅसेज आला.* " याच्याही पुढे जात ATM मशीन प्रत्येक व्यवहाराला 20-30 पर्यंत चार्ज कट करत राहिले .मशीनमध्ये पैसे नाहीत हि सूचना कुठेही नाही आणि वापले कि पैसे तर मिळाले नाहीत पण कमी मात्र होत गेले.
ही अशी परिस्थिती सगळीकडे आहे.त्याला आपला महाराष्ट्रही अपवाद नाही. सरकारने भारत कॅशलेस करण्याच्या नादात आम्हाला कधी हेल्पलेस केले ते कळलेच नाही.
*रेल्वेचा ढिसाळपणा परिणामी आमचे बदलते नियोजन:*
15 तारखेला पहाटे 5.30 वास्त सुरु झालेला प्रवास अविरतपणे संशोधनाचे कार्य करत 16 नोव्हेंबर ला पहाटे 3 च्या सुमारास अजमेर मध्ये पोहचल्यावर निवस्थानी पोहचल्यावर संपला.तिघालाही झोप लागत होती पण नॉर्थ इस्ट राज्यांकडे जाण्यासाठी नियोजित प्रवासाची तयारी करावयाची होती. कारण याच दिवशी रात्री 11:40 ला दिल्लीतून गुवाहाटी ला जाण्यासाठी ब्रम्हपुत्रा मेल मध्ये रिझर्व्हवेशन होते,त्यामुळे कसल्याही परिस्थितीत यावेळेच्या अगोदर दिल्लीत पोहचणे आवश्यक होते.
आदल्या दिवशी ऋषीकेश सरांनी व अमोल दादांनी राहिलेल्या प्रवासासाठी फोर व्हीलर बुक केली होती. जयपूरहून दिल्ली अशी रेल्वे तत्काळ तिकिट मिळत नव्हते.पहिले तिकीट ज्यास्त वेटिंग होते.पण आमचे काम आवरून दिल्लीत 11:40 च्या आत पोहोचणारी एकच रेल्वे होती ती म्हणजे अजमेरहून निघणारी गरीब नवाज एक्स्प्रेस. या गाडीचे तिकीट उपलब्ध होते . त्या गाडीचे पहाटे रिजर्व्हवेशन केले.ही गाडी सकाळी अजमेरहून 11च्या आसपास निघून दिल्लीत रात्री 8 च्या आसपास जाणार होती. अन आम्हाला पुढची रेल्वे मिळणार होती.
आदल्या दिवशी परीसरातील बाकी काम करण्यासाठी जी फोर व्हीलर ठरवली होती, ते पैसे वाया जाणार होते असे दिसत होते पण ती गाडी सकाळी लवकर बोलून कुठलीही विश्रांती न घेता आम्ही आवरून निघालो. अतिशय तारेवरची कसरत करत . अजमेरचा परिसर ,पुष्कर कारीगरक्षेत्र,तिल्लोनिया येथील संशोधन केंद्र भेटी देत अजमेरच्या पुढचे रेल्वे स्टेशन फुलेरा येथे पोहचताना खराब रस्ते, चुकीचे किलोमीटर व दिशा दाखवणाऱ्या पाट्या,न मिळणारे नेटवर्क,गुगल वर येणारे चुकीचे KM यामुळे मनस्ताप वाढत होता पण तरीही टीम मात्र कूल होती गाडीतही पुढील नियोजन सुरू होते.आमच्या सारथीच्या अनुभवामुळे आम्ही वेळेत पोहचलो.12 वाजेपर्यंत येणाऱ्या नवाझ एक्स्प्रेसची वाट बघत या स्टेशनवर थांबलो.इथपर्यंत सर्व काही ठीक होतं.
1 वाजला तरी, सूचना न मिळाल्याने गाडीची चौकशी करण्या अगोदर online पाहिले तर कळाले की वेळेवर दाखवत असलेली गाडी 6 तास उशिरा आहे.' _ही गाडी आता 6 तास उशिरा येणार आहे',_ हे आम्ही तेथील रेल्वे ऑफिसर यांना सांगितले,इतके ते झोपले होते .या बाबत स्टेशन मास्तरकडे चौकशी केल्यावर ते उलट आम्हाला विचारात होते इतका लेट आहे का ? म्हणून शेवटी त्यांनी फोनवरून माहिती घेतली व कन्फर्म केले.तेव्हा... आमच्या पायाखालची जमीन सरकली.
पुढील कुठलीच माहिती मिळत नव्हती कारण कळत नव्हते तिकीट रद्द होत नव्हते .म्हणजे वेळ व पैसे दोन्ही फुकट जाणार.दिल्ली ते गुवाहाटी प्रवास विचार करताच अंगावर शहारे आले .पुढचे महागडे तिकीट,काटेकोर वेळ आठवतच दिवसा तारे दिसायला लागले.आम्हाला दिल्लीत रात्री 11:40 आत काहीही करून पोहोचायचे होते.
फुलेरा या शहरातून 2 वाजता प्रवास सुरु करून शहरातून बसने जयपूरला 4:15 आलो. जयपूरहून 4:30 वाजता दिल्लीला निघण्यासाठी बसने 280 किलोमीटर अंतर कापत निघालो . ढोबळमानाने विचार केला तर हे अंतर सहज 6 तास पुरे .त्यामुळे 11:40 च्या आत पार पाडू असा विचार केला. पण NH-8 वरील दिल्लीपर्यंत असणाऱ्या ट्राफिक मुळे या इराद्यावरही पाणी पडले.
मग दुसरा B प्लॅन ठरवला.गुडगाव ला उतरायचे तेथून मेट्रो पकडायची.चांदणी चौक बाजार येथे उतरून दिल्ली स्टेशनकडे जायाचे.प्रवासात धक् धक् सुरु होती आज वेळेचे किंमत कळत होती.हा सगळा प्रवास चित्रपटा सारखा सुरु होता.मेट्रोत एकच प्लॅन सुरु होता तो म्हणजे मेट्रो स्टेशनवर पोहचणे व दुसरी ट्रेन सुटणे यामधील 9 मिनिटांची कसरत कशी पार करायची.या नऊ मिनिटात मेट्रोच्या वरच्या मजल्यावरून खाली येणे व वरती पायऱ्या चढून बाहेर पडणे. हे अंतर चेक पॉईंट पार करत 700मी चे अंतर अगदी अडथळ्यांची शर्यत होती.परीक्षा तर पुढे होती मॅटो ते दिल्ली स्टेशन परत 400 मीटर आणि नंतर PF16 म्हणजे अगदी विरुद्ध टोकाला गंमत म्हणजे 20दिवसाच्या प्रवासातील सामान संशोधनाचे शोधलेले डोकमेंट्स,सॅम्पल, पुस्तके आणि शतकी पायऱ्या आम्ही एकमेकांकडे पाहत होतो.यात पी टी उषा,मिल्खा,चक दे सगळे डायलॉग सुचवत टेंशन दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.अमोल दादा ट्रेन सुटली तर काय असं विचारत होते तेंव्हा ऋषिकेश दादाचे एकच उत्तर होते ,'आपण पोहचू जो आदी जाईल त्याने वेळप्रसंगी PF वर सामान सोडून वर चढायचे व चैन ओढायची दंड भरू पण ट्रेन सोडायची नाही. आपण गेल्याशिवाय ती सुटणार नाही भले हि 2 तास लेट होईल...येवढी वाट लागूनही हे दोघे येवढे कूल अर्थात चिंता त्यांनाही होती पण...
मेट्रोमध्ये अश्याच एका कलाम सरांबरोबरच्या प्रवासातील 2010 ची आठवण सांगत ऋषिकेश दादा म्हणतो,"संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी शानदार होगी।"या वाक्यावर एकदम हाश्या पेटला थोडक्यात आम्ही आमचे तणाव दूर करत होतो. आता स्टेशन जवळ आलं धाकधूक वाढू लागली सगळ्याचे मोबाईल कागदावर लिहून घेतले.सिग्नल होताच आता सुसाट पळायचे व ट्रेन पकडायची असं ठरलं.....
43 तास अहोरात्र न विश्रांती घेता काम करून डोळ्यातून पाणी ओघळत होते पण या घटनेत तेही कधी बंद झाले समजले नाही...
*अन..शेवटचे 9 मिनिट...*
ठरल्याप्रमाणे दिल्ली स्टेशनवर जाण्यासाठी गुडगाव मेट्रो स्टेशनवरून 10:31 आम्ही बसलो.पूर्णपणे 1 तासानंतर म्हणजे 11:31 ला चांदणी बाजार या मेट्रो स्टेशनवर उतरलो.
आता या 9 मिनिटांसाठी जर ट्रेन हुकली तर पुढचे सर्व नियोजन पाण्यात जाणार होते.11:31 वाजता मेट्रो चांदणी बाजार या स्टेशनवर थांबली अन आम्ही सुसाट पळत सुटलो दिल्ली स्टेशन कडे.11:36 ला मी स्टेशन गेट पर्यंत जाईपर्यंत ऋषिकेश सर पुढे पोहचताच एका कुलीला आलिंगन देताना दिसले.अगदी आनंदी मुद्रेत अन समजले की ," *ब्रम्हपुत्रा मेल लेट झाली आहे.* "तेव्हा क्षणभर खूप आनंद झाला अन दीर्घकाळासाठी रेल्वे प्रशासनावर चीड निर्माण झाली.
नंतर अर्धा तास एक तास दोन तास असे करत गाडी एवढी लेट झाली की,ती 17 नोव्हेंबर च्या दुपारी 12 वाजता पुढचा प्रवास सुरू झाला . _तो पर्यंत या ब्रम्हपुत्रा ट्रेनने आमच्या पुढच्या नॉर्थ इस्ट राज्याच्या सर्व नियोजनाचे 12 वाजवले होते.....ते निस्तरताना सकाळी रेल्वे PF वर ऋषिकेश सरांचे ऑफिस सुरु झाले ते सकाळी 12 पर्यंत …
© SAUDAGAR KALE
(हीच क्रमिक लेखमालिका मी माझ्या फेसबुक वालवर दररोज प्रसिद्ध केली होती.)