आंतरराष्ट्रीय युवा व सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्र टीमने केली कौतुकास्पद कामगिरी.

आंतरराष्ट्रीय युवा व सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्र टीमने केली कौतुकास्पद कामगिरी.


कर्णाल,हरियाणा मध्ये दि.21 ते 29 ऑक्टों या कालावधीत संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवातील महाराष्ट्र टीमच्या कामगिरीचा सौदागर काळे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा:


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे येथून आमची महाराष्ट्र टीम निघाली "हारमनी 2017" हा आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव संपन्न होत असलेल्या हरियाणाची सांस्कृतिक राजधानी कर्णाल या शहरात.कर्णालमधून  देशाचा NH-1 मार्ग जातो.कर्णाल हे नाव या शहराला महाभारतातील उदार मनाच्या कर्णावरून पडलेले आहे असा उल्लेख केला जातो. कर्णाल हे शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.जवळच मराठ्यांचा दुर्देवी पराभव झालेले 'पानिपत' हे ठिकाण पानिपतच्या लढाईच्या इतिहासात घेऊन गेल्याशिवाय राहवत नाही.

      आम्ही झेलम एक्सप्रेसचा 25-30तासाचा प्रवास करून फेस्टिव्हल ठिकाणी पहाटे 2 वाजता आलो तरी सुद्धा या लोकांनी भुकेल्या पोटांना जेवण दिले.यावरून एवढं नक्की कळतं हे खरंच कर्णाचे वंशज आहेत.एरव्ही आपण आपल्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा नाष्टा ठेवला तर पास दाखवल्याशिवाय  नाष्टा देत नाही.इथं मात्र केव्हाही, कधीही, कोणीही बिनापासशिवाय भरपूर पोटभरून दर्जेदार जेवण करत असे. त्यामुळे थंडी सुरु होऊनही ती याचमुळे कारणामुळे जाणवत नसावी असं वाटून गेलं.

             23 Oct रोजी सर्वजण विविध राज्यांमधून आलेले कलाकार,विविध क्षेत्रातले उल्लेखनीय कामगिरी केलेले युवक आपल्या राज्यातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून तयार झाले होते.
देशातील प्रत्येक राज्याची आपआपली परंपरा,वेशभूषा,भाषा,संस्कृती वेगळी असतानाही भारत आजही एकसंध कसा आहे?याचं उत्तर कर्णाल शहरातून निघालेल्या एकता युवक रॅलीने सर्वाना दिले.
मूळातच 'हारमनी फेस्टिव्हल'असं  नाव असलेल्या  हारमनी या इंग्रजी शब्दाचा  मराठीत अर्थ होतो सुसंवाद.तो इथं साध्य झाला हे मात्र नक्की.


 महाराष्ट्रारातील युवकांची सेमिनार मध्ये भूमिका:

 प्रत्येक दिवशी फेस्टिव्हल मध्ये विविधांगी विषयावर सेमिनार संपन्न होत असे.त्यात आपल्या युवकांचे योगदान खूप मोलाचे होते.त्यात पहिल्या दिवशी भ्रष्टाचार या विषयावरच्या सेमिनार पासून सुरुवात झाली .त्यामध्ये निवृत्त IPS अधिकारी कामराज यांनी भ्रष्ट आचरण करणाऱ्या विरुद्ध स्वतः कसा सामना केला तसेच आपली बाजू सत्याची असेल जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही हे अनुभवाचे बोल युवकांसमोर मांडले होते. त्यानंतर ;'बेटी बचाओ,बेटी पढाओ' या सेमिनार मध्ये आपले विचार मांडण्यासाठी दोन वेळा एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिली भारतीय महिला  अनिता कुंडुजी व हरियाणा राज्याच्या IG ऑफिसर सुमन मंत्रीजी या प्रमुख  होत्या.यावेळी एवरेस्टवीर अनिता कुंडुजीने आपल्या भाषणात विशेषतःमुलींना संदेश दिला."कामायबी अपनी कदमों में होती हैं, कभी बाहर नहीं होती है|" तसेच सुमन मंत्रीजी यांनी आसाम,नागालँड यासारख्या पूर्वेकडील राज्यात व दक्षिण भारतात महिलांना सन्मान दिला जातो म्हणून तिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे,पण स्वतःला पुढारलेले राज्य मिरवणारे स्त्री भ्रूणहत्या  करतात ही चिंतेची बाब आहे,असे सांगितले.आपल्या महाराष्ट्रात मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मुलींचे प्रमाण जास्त आहे हे विशेष बाब.हे वाक्य त्यांनी अधोरेखित केले.
      'स्वच्छ भारत अभियान.' या सेमिनार वेळी  आपल्या महाराष्ट्र टीमने स्वच्छता विषयावर पथनाट्य केले तसेच अमर चिखले याने आपल्या मनोगतात थोडक्यात महत्त्वपूर्ण संदेश दिला.यानंतर या विषयावर बोलताना कर्णाल शहराचे आयुक्त धीरज कुमार यांनी आपल्या कवितेत भगतसिंग यांना बोलतं करत युवकांना आपल्या जबाबदारीबद्दल जाब विचारला लावला.त्या कवितेची सुरुवात अशी केली होती ..
     
"ये सोच कर भगतसिंग
हैरत और चिंता में पड गया..

तुम उस देश को
स्वच्छ भी न रख सखे

मैं जिस देश के लिए
फाशी पर चढ गया!"
     या ओळी ऐकून सर्व तरुण खूप अंतर्मुख झाले होते.
     
          "youth thrust for drugs free society". या विषयाच्या सेमिनारमधून तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता ही फक्त एका युवकाची समस्या नसून ही पूर्ण देशाच्या उन्नतीचा एक मोठा अडथळा आहे.असा सार निघाला.यावेळी आपल्या महाराष्ट्रातील ऋषीकेश खिलारे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अश्विनी शेट्टी मंगलोर,कर्नाटक व राजेश कुमार यांनी पीपीटीच्या माध्यमातून हा प्रश्न सुलभरित्या सर्वांसमोर मांडून त्याची दाहकता स्पष्ट केली.यावेळी मुकुल शर्मा ,उत्तराखंड यांनी या विषयावर बोलताना म्हणाले की,"जब हम रबर खिचेगें तो लंबी हो जायगी लेकीन सिगारेट अंदर खिचेंगे तो अपना जीवन छोटा हो जायगा" अशा वाक्यातून उपस्थित तरुणाना विचार करण्यास प्रवृत्त केले होते.
         
        "International youth conference on counter Terrorism" या सेमिनारमध्ये दहशतवादाची कीड फक्त ठराविक देशांना ,धर्माला लक्ष करत नाही तर पूर्ण मानव जातीला लक्ष करत आहे.या विषयावर मत व अनुभव व्यक्त करण्यासाठी ज्यांना  "जिंदा शहीद" म्हणून संपूर्ण भारत ओळखतो ते मनींदरजीतसिंग बीटा हे होते.त्यांनी शत्रूशी लढताना खूप वेळा गोळ्यांचा सामना केला ,अंगाची चाळण झाली पण ते सर्वाना पुरून उरले.ते अनुभव कथन करताना म्हणाले की,"प्रत्येकजण आज आपल्या जातीत ,धर्माच्या भक्तीत अडकला आहे पण खरी गरज जिच्या पोटी जन्म घेतला त्या मातृभूमीची भक्ती करण्याचा." त्यांनी उच्चारलेले प्रत्येक शब्द शत्रूंसाठी, देशविघातक लोंकासाठी एक प्रकारचा तोफगोळ्याचा मारा होता.त्यांनी केलेले सीमेवरचे अनुभवकथन समोरच्या अंगावर शहारे आणत होते.यानंतर महाराष्टातील सौदागर काळे याला दहशतवाद विषयावर विचार मांडण्याची संधी मिळाली.तेव्हा त्याने हे विचार मांडले की,"दहशत वाद हा एका देशाचा, धर्माचा,पंथाचा विषय राहिला नसून तो पूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.त्यामुळे जगातील युवकानी हा आपला जगण्याचा विषय आहे असे समजून लढा द्यायला हवा ,असं सांगितलं."
        ‎
        ‎"तारे जमीं पर"या विशेष सेमिनार मध्ये 'स्पेशल लहान मुलांना' कार्यक्रम पाहण्यासाठी आणण्यात आले होते.खास त्यांच्यासाठी 'पंचतंत्र की कहाणी' ही नाटिका  युवकांनी सादर केली.या सेमिनारमध्ये हरियाणा राज्य बाल कल्याण परिषदाच्या मानद महासचिव संतोष अत्रेजा या प्रमुख वक्त्या होत्या.त्यांनी अनाथ मुले, दिव्यांग मुले,घरेलू कामगार मुले यांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर मुद्देसूद विचार मांडले.
           
          व्हीजन 2020 या सेमिनार मध्ये आपल्या महाराष्ट्र टीमधील डॉ.ऋषीकेश खिलारे यांना तरुणांच्या वतीने सभागृहाचा निवेदक म्हणून संधी देण्यात आली.तसेच त्यांनी या  विषयावरती आपली भूमिका मांडली होती."तरुणांनी सध्या क्रिकेट सारख्या 20-20 मधून बाहेर येऊन वंचीत,आदिवासी समाजाला इंडिया 2020 मध्ये भागीदार करण्यासाठी त्यांनी व्हीजन ठेवावे" असा त्यांच्या विचारांचा सार होता.तसेच त्यांच्या विविधांगी ,समयसूचकता माहितीने सेमिनारला पूर्णत्व प्राप्त झाले.अशा प्रत्येक सेमिनारमध्ये आपल्या महाराष्ट्रातील युवकांनी मांडलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र टीमने सर्वांसमोर विशेषत्व प्राप्त केले.
       
 सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र टीम:

                   पु.ल.देशपांडे एका ठिकाणी म्हणतात की,"कोंबड्याला जशी पहाटेची चाहूल सर्वांआधी लागून तो आरवतो, तशी बदलत्या परिस्थिची चाहूल निर्मितीक्षम कलावंताला आधी लागते."अशा कल्चरमधील निर्मितीक्षम कलावंतांचे सामाजिक संदेश देणारे विविध राज्यांचे नृत्य येथे झाले होते.
             
       ‎आपल्या महाराष्ट्र टीममधून नागपूरच्या मुलींनी सादर केलेली लावणी व सोलापूरच्या दत्ता भोसले याने सादर केलेली लावणी रसिकांना आठवणीत राहिली.तसेच आपल्या म्हाराष्टाची समृद्ध परंपरा असलेली  "पंढरपूरची वारी"ही बारामतीच्या शाळकरी मुलींनी सजीव देखाव्याच्या माध्यमातून देश -विदेश कलाकारांसमोर सादर करून साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले त्यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते.मुंबईच्या टीमने पारंपरिक कोळीनृत्य सादर करून महाराष्ट्राच्या विविधांगी कलेची चुणूक सर्वांसमोर दाखवून देऊन अनेकांना ठेका धरायला लावला.आपल्या टीमने वासुदेव ,एकनाथी भारूड सादर करून सर्वांसमोर लोकपरंपरा आणली.
त्याचप्रमाणे  'येळकुट, येळकूट','उदे गं अंबे उदे','मल्हारी गीत'अशा लोकगीतांवर पाच प्रकारचे नृत्य सादर करून सर्वाना भक्तिमय केले.तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  व झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यांच्या जीवनावरील पोवाडे सादर करून महाराष्ट्र टीमने सर्वाना इतिहासात नेले.दत्ता भोसले याने "जहाँ डाल डाल पर..."या गीतावर सुंदर नृत्य केले.समाजातील वाढती विषमता,सामाजिक भेदभाव ,भूकबळी या समस्येला वाचा फोडण्यासाठी नटरंग चित्रपटातील "खेळ मांडला"या गाण्यावर नृत्य करून महाराष्ट्र टीमने सभागृहाला भावनिक केले.
       
 विविध राज्य व देशांचे सांस्कृतिक ,लोकनृत्य कार्यक्रम:

         या महोत्सवात 29 राज्ये ,7 केंद्रशासित प्रदेश व रशिया,न्यूझीलंड,जपान सारखे देश सहभागी झाले होते.
न्यूझीलंडच्या मुलीने 'डॉग मारो फ्युजन' हा नृत्य प्रकार सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच रशियन मुलांनी आपल्या बॉलिवुड गाण्यावर एक वेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले.या तसेच न्यूझीलंड देशातील युवतीने केलेले आंध्रप्रदेशातील 'नवरसमुलादी:हे भारतीय नृत्य सर्वाना आवडले होते.
             रोज  रात्री लोकनृत्याच्या माध्यमातून विविधांगी कलेचे दर्शन होत.आसाम मिझोरोम,अरुणाचल प्रदेश पॉप गायन,सिक्कीम,झारखंडचे आदिवासी नृत्य,आंध्रप्रदेशचे कुचीपडी नृत्य,तेलंगांनाचे अर्धनटश्वरी सारखं लोप पावत चाललेले नृत्य सादर करून साऱ्यांना विविधतेचे दर्शन दिले. अरुणाचल प्रदेशचे गायन व नृत्य,प.बंगालच्या मुलीने सादर केलेले कथ्थक,जम्मू -काश्मीर चा 'बच नगमा',ओडिसी मुलांनी सादर केलेले संभलपुरी नृत्य,राजस्थान,आसाम, मणिपूर त्रिपुरा,झारखंड,पॉडेंचेरी यांचे नृत्य विशेष ठरले.छत्तीसगड राज्यातील टीमने सलग सहा ते सात  विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करून सर्वाना आश्चर्यचकित केले अन सभागृहात नंतर एकच आवाज घुमत राहिला....छत्तीस गढीया, सबसे बढिया...
  छत्तीस गढीया, सबसे बढिया...
         मणीपुरच्या 'मार्शल आर्ट'या प्रकारच्या नृत्यातून झाली.आपल्या नागपूरच्या मुलीने राजस्थानी नृत्य करून एक प्रकारचे अभिसरण घडवून आणले.चंदीगढ,पंजाब चा भांगडा नृत्य.त्रिपुरा ,आसाम,नागालँड ने आदिवासी नृत्य सादर केले.कर्नाटकच्या तरुण डॉकटरांनी सादर केलेले नृत्य सर्वाना खूप आवडले.दमन व दिव या केंद्रशासित प्रदेशमधील तरुणांनी 'रॉक बँड'च्या माध्यमातून गायन केले.
           ‎
           ‎श्री तळपल्ली लोकनाथ रामोजी यांनी कर्नाटकी, हिंदुस्थानी व वेस्टर्न संगीत गायन करून सर्वाना मंत्रमुग्ध केलं.कर्नाटकचे आदिवासी, हरियाणाचे भोजपुरी लोकनृत्य व आसामच्या लहान मुलांचे नृत्य हे विशेष ठरले.पश्चिम बंगालचे रामकृष्ण चटोपध्याय यांनी कोरिग्राफर केलेले 'जय भारतीय'हे नृत्य सुंदर झाले.आंध्रप्रदेशातील युवकांनी सादर केलेल्या 'डपलू नृत्याने'सर्वाना सैराट करून सोडले होते
           ‎
           ‎शेतकरी आत्महत्या हा आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याचा ज्वलंत प्रश्न.पण याचं उत्तर दिलं आसाम या राज्याने."जल हैं तो कल हैं"म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा असा संदेश देत तर एखाद्या भूभागावरच देव पाऊस पाडण्यास कसा काय विसरतो?हा प्रश्न ते विचारतात .म्हणून आसाम ने केलेले नृत्य सर्वोत्तम ठरलं .अनेकांचे डोळे शेतकऱ्यांप्रती व दुष्काळग्रस्तांसाठी पाणावले.ज्या गाण्यावर नृत्य केले ते गाण्याचे बोल मात्र तेव्हा डोळ्याच्या कडा ओल्या करून गेले होते.....
             हे सुनाए पुरे ..
             धरती तू चलाता हैं|
           
             मेरे भी सुनले अर्ज..
             मुझे घर बुलाता हैं|
           
             भगवान हैं कहाँ रे तू...
             ये खुदा हैं कहाँ रे तू....(PK)
         

 कुरुक्षेत्र भेट व शेवट:

          महाभारत जिथं घडलं ते ठिकाण म्हणजे हरियाणातील कुरुक्षेत्र. याच ठिकाणी सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून सामील झाले होते.तिथं श्रीकृष्ण रथ हाकत असलेली प्रतिकृती खूप मोठी आहे.
         
            तिथं असलेले श्रीकृष्ण संग्रहालय इतिहासामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाला खूप महत्त्वाचे आहे.या मध्ये हडप्पाकालीन नाणी ,भांडी, परंपरा,संस्कृती यांचं दर्शन होतं. कुशान व गुप्त काळातील बांधकामाची वीट ,भागवत पुराण काळातील पांडु लीपी, लोकमान्य टिळकांची 'गीतेचं रहस्य'(1935)पहिली आवृत्तीची प्रत पाहायला मिळते.महाराष्ट्रातील राखी साळुंखे यांनी निर्मित केलेल्या महाभारतातील दृश्यांवरची वारली पेंटिंग खूप सुंदर आहेत.यामध्ये खूप जुन्या गोष्टी आहेत पण ते सर्व पाहायला आपल्याकडे  निवांत वेळ हवा.जवळच आधुनिक पद्धतीने निर्मित केलेले व विज्ञानाचा आविष्कार असलेले संग्रहालय आहे.
           एके दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमकरिता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल H.E.आचार्य देवव्रथ व हरियाणा सरकारमधील अन्न आणि पुरवठा मंत्री श्री करण देव कुंभोज यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यपाल यांनी आपल्या भाषणात ,"आपली संस्कृती विदेश देश स्वीकारत आहेत तर आपण भारतीय ते नष्ट करत आहोत.",ही चिंता व्यक्त केली.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपालच्या हस्ते सन्मानित केले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील भरत जेठवानी यांचा समावेश होता.तसेच या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवाची सांगता कार्यक्रम हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर,गायक सोनू निगम,अभिनेता यशपाल शर्मा यांच्या उपस्थित झाला .
       
  *आम्ही काय शिकलो?*
   
                           इथं स्पर्धा नव्हती,इथं इर्षा नव्हती,इथं जिद्द नव्हती,इथं फक्त आपुलकी ,जिव्हाळा,सुसंवाद,प्रत्येक राज्या -राज्यांतील ,देशांदेशातील एक नवं अभिसरण अनुभवण्याचा एक रंगमंच होता.

                         काही ग्रामीण भागातील मुलांनी कधी दिल्ली पाहिली नव्हती त्याच मुलांनी दिल्ली ओलांडून कर्णाल पाहिले.आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल मध्ये आपण भाग घेत आहोत याचे अप्रूप होतेच पण त्याच्याही पुढे आपण एक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहोत याचा अभिमान होता.
   
                      इथं आलो तेव्हा कुणी आसामी , बंगाली,  कन्नड,तामिळ,हिंदी, उडिया,कुणी पंजाबी,राजस्थानी,उर्दू, गुजराथी, मल्याळम,कोकणी बोलत होता. तर काही वेळेस इंग्रजी,जपानी, रशियन भाषाही कानावर पडत होती.फक्त बॉलिवुड ,लावणी डान्स पाहणारे आम्ही  सत्रीयन,भरतनाट्यम,कुचीपडी, गरबा,मणिपुरी,विविध राज्यांचे आदिवासी ,लोकनृत्य व अजून बरंच काही.हे सारं कोणत्या विद्यापीठात ,शाळेत कितीही पैसे ओतले तर आम्हांला हा अनुभव मिळणार नव्हता,एवढं मात्र खरं.
     
              प्रत्येकांशी बोलताना कधीही भाषेची अडसर आली नाही.आपण कधी कधी भेळ खात असतो .तेव्हा ती खूप विविध प्रकारच्या घटकांनी परिपूर्ण होते.तेव्हाच ती स्वादिष्ट,चविष्ट बनते.अशीच इथं विविध भाषेची,परंपरेची भेळ झाली ती कधीच संपू नये असं वाटत होतं.
 
             इथं पहिल्या दिवसापासून एक मोठा सामाजिक संदेश दिला जात होता तो म्हणजे प्रत्येक दिवशी येणाऱ्या मान्यवरांना 'बुके नहीं बुक' देऊन स्वागत केले जात असे.ही परंपरा आपल्या विचारहीन होणाऱ्या समाजासाठी खूप महत्त्वाची आहे.
     
                    आपल्या महाराष्ट्र टीमने येथे येऊन फक्त सांस्कृतिक व सेमिनार मध्ये भाग घेतला नाही तर विविध वेळप्रसंगी समाजहितासाठी आपले युवक पुढे आले.त्यात रोजची स्वच्छता असेल,भोजन वाढणे असेल,लहान मुलांना खाऊ वाटप असेल,तर O+ सारख्या दुर्मिळ रक्तगटासाठी अमीर काझी  या युवकांने रक्तदान केलेले असेल, तेव्हा असंच वाटून गेलं की आपला महाराष्ट्र मराठ्यांची 'कर्मभूमी'असली तरी हरियाणा ही खूप वर्षांपूर्वीची  'रणभूमी' आहे. याच रणभूमीत 'मराठे आता फक्त रक्त सांडत नाहीत तर वेळप्रसंगी रक्तदानही करू शकतात.' हा मोठा संदेश आपल्या राज्याचा मानबिंदू ठरला.
     
             निफाचे अध्यक्ष प्रीतपाल सिंह पन्नु यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले 9 दिवसाचे फेस्टिव्हलचे नियोजन हा एक आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंटचा विषय ठरला.त्यात भोजनाचे ,राहण्याचे,स्वागताचे,
सभागृहातील वातावरणाचा समावेश आहे.भविष्यात आम्हांला अशा नियोजनासाठी एक मजबूत अनुभवाचा धडा मिळाला.
     
          शेवटच्या प्रत्येक राज्यांतील युवकांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येत होते.त्यात आपल्याही महाराष्ट्र टीमचा समावेश होता.या वितरणाच्या मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू राहत निरोप सभारंभाला रंगत आली.
     
       आपली महाराष्ट्र टीम सर्वांपेक्षा गुणवत्तेत वेगळी दिसावी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक मंत्रालयाच्या अधिकारी कविता नवांडे मॅडम, निफाचे महाराष्ट्र अध्यक्ष भरत जेठवानी ,युवान फाउंडेशनचे सौरभ नवांडे,विशाल ठाकरे  मेळघाटसारख्या आदिवासी भागात अविरत कार्य करणारे डॉ.ऋषीकेश खिलारे यांनी खूप मेहनत घेतली.
     
शेवटी आम्ही कर्णाल मधून  निघताना गुलजारच्या या ओळी  आमच्या मनातून जाता नव्हत्या....

उडून जाताना पाखराने
फक्त इतकेच पाहिले
किती तरी वेळ ...
फांदी हात हलवत होती.

निरोप घेण्यासाठी?
की
पुन्हा बोलावण्यासाठी?

©सौदागर काळे, पंढरपूर.
(प्रस्तुत लेखक महाराष्ट्र टीममध्ये सहभागी होते.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...