युवकांच्या बेकारीवरती बोलू काही.......

युवकांच्या बेकारीवरती
बोलू काही..........

सर विलियम बेवरिज नावाचा विचारवंत एका ठिकाणी म्हणतो की,"व्यक्ती नहीं नौकरीयो को प्रतिक्षा करनी चाहीए." मात्र यांचं हे वाक्य आपला स्वाभिमान जागवण्यासाठी एकवेळ ठीक आहे,पण खरंच असं स्वप्न आपल्या 121 कोटी वरच्या लोकसंख्येत बाळगणं कितपत योग्य आहे?
     आजचा हा तरुण 'जगण्यासाठी दाही दिशा' या कारणांसाठी पदव्यांची कागदपत्रे घेऊन हिंडतो आहे.तरीही त्याच्या लायकीचा  रोजगार त्याला मिळत नाही; मिळाला तर "त्यानं जगूही नये व मरुही नये" अशा बेतातला रोजगार मिळतो. मग तो 'गडया आपला गाव बरा' असं म्हणत 'छुपी बेरोजगारी' या बेकारीच्या जुन्या प्रकारात सामील  होतो .खरंतर या बेकारीला'मुकी' बेरोजगारी का म्हणू नये?असाही प्रश्न कधीकधी मनाला पडतो.कारण ती कधीच या व्यवस्थेला बोलताना दिसली नाही,की आम्ही उच्चशिक्षित असूनही बेकार का? आमच्या या एकुलत्या एक आयुष्याचा वाटोळं करणारा अपराधी कोण?असा सवाल करत ती कधी कोर्टात गेली नाही! ना कधी या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं म्हणून ही रस्त्यावर उतरली नाही!मात्र राजकारण्यांसाठी स्वतःच्या अस्तित्वाची पदवी वेशीला टांगून पुढे आलेली दिसली.अन तो युवक आजही 'मुका' आहे. कदाचित या राजकारण्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 'छुपा' पाठींबा असावा.
      शेतीचं क्षेत्र जसं भरवसा ठेवण्याजोगं नाही तसंच काहीतरी शिक्षण क्षेत्राचं झालं आहे कारण शेतीतली गुंतवणूक जशी नफा मिळवून देईलच याची शाश्वती देत नाही तसंच शिक्षण या क्षेत्राचं सुद्धा झालं आहे.
      खरंतर शेती हा धंदा म्हणून झपाट्याने उदयास यायला हवा होता परंतु शिक्षण हे क्षेत्र  संस्काराचे केंद्र न राहता मोठा धंदा म्हणून उदयास आला.अन याच दुकानदारीची आजची व येणारी पिढी ग्राहक झाली आहे.
      बाजारपेठेचा एक अजरामर नियम आहे,"मागणी तसा पुरवठा" या नियमाला धरून जर अर्थव्यवस्था वाटचाल करत नसेल तर एकतर त्या देशाला मंदीला किंवा तेजीला आव्हान द्यावं लागतं.शिक्षण क्षेत्रात काही क्षेत्रांची मागणी नसताना भरमसाठ तरुणांचा पुरवठा वाढला. त्याची परिणती बेकारीत झाली.अन उत्पादन मात्र सुमार दर्जाचं झालं.
      आताचे शिक्षण हे बेरोजगांराचे कारखाने नसून ते स्वतःला सिद्ध करण्याचं व्यासपीठ व्हावं,या यासाठी शासनाला  पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेराला हवं.
      सरकार नावाची व्यवस्था फक्त साक्षरतेची टक्केवारी वाढवताना दिसती आहे अन स्वतःची पाठ स्वतःच थोपटताना सार्थक झाल्यासारखी वागते आहे. उदा.शाळेत येण्याचं प्रमाण वाढावं म्हणून नापासच न करणं, दहावी सारख्या परिक्षेत 100% गुण मिळण्याची व्यवस्था करणं असे अनेक निर्णय आहेत,जे तात्पुरत्या डोकेदुखीवर गोळीच्या माध्यमातून इलाज शोधल्या सारखं आहे.
      आजच्या बेरोजगारीचं कारण भरमसाठ वाढणारी लोकसंख्या सांगितलं जातं,यामध्ये काही तथ्य असलं तर हे पूर्णतः कारण असू शकत नाही.कारण आजच्या भारताच्या रोजगाराच्या उपलब्धतेकडे पाहिल्यास असं आढळून येतं आहे की अनौपचारिक क्षेत्रात जवळपास 92% रोजगार उपलब्ध तर औपचारिक क्षेत्रात 8%रोजगार उपलब्ध आहेत.
      इथेच बेकारीची मोठी मेख आहे .मोठ्या प्रमाणात तरूण 8% च्या नोकरीसाठी आपली तिशी ओलांडताना दिसतो आहे,ही खूप चिंतेची बाब आहे.
      दुसरी विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे इंडिया स्कीलच्या अहवालानुसार शिक्षित युवकांपैकी फक्त 40% जण रोजगार करण्याच्या लायकीचे आहेत.म्हणजे आजच्या तरुणांची अवस्था सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे "ना घर का ना घाट का!"अशी झाली आहे.एकीकडे शासन 'बेटी बचाओ,बेटी पढाओ" अशी योजना राबवत आहे,पण ज्या बेटी कुटूंबाला, समाजाला तोंड देत उच्चशिक्षित झाल्या आहेत त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण 48%इतकं आहे.मग या अपयशाचा धनी कोण?
      एकीकडे तरुण रोजगार शोधत आहे दुसरीकडे उद्योगसमूह कौशल्यपूर्ण युवकांच्या शोधात आहेत.या 'विषम' गणिताला 'सम' कसं करायचं हा मोठा प्रश्न शासनाला पडायला हवा.
      आपण या प्रश्नावर महाराष्ट्राचा विचार केला तर NSDC चा स्कील गॅप 2012 चा अहवाल असं सांगतो की,महाराष्ट्र या राज्याला माहिती तंत्रज्ञान,संघटित रिटेल,बांधकाम ,कृषी व कृषिआधारीत व्यवसाय,रसायन व औषधे, हिरे,दागदागिने या क्षेत्रात खूप मागणी आहे.पण आजचा युवक वरील दोन म्हणजे माहिती तंत्रज्ञान व संघटीत रिटेल या क्षेत्राचा अपवाद वगळता उरलेल्या क्षेत्रात रोजगार करण्यास उदासीन आहे.
      या वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून भारत सरकारने आतापर्यंत,'प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम','स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना','स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना',तसंच आताच्या सरकारच्या'मेक इन इंडिया','स्कील इंडिया'या योजना राबवताना दिसलेले आहेत.या योजनांनी तरुणांना काय दिलं हा एक वेगळ्या संशोधनाची बाब आहे,पण मूळ प्रश्न बेरोजगारीचा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.
      पण एवढं मात्र नक्की आहे,आजची शिक्षण प्रणाली आमूलाग्र बदलायला हवी नाहीतर न येणाऱ्या 'बस'साठी आजच्या युवकांनी कुठपर्यंत वाट पाहायची?
       वर म्हटल्याप्रमाणे आपण नोकरीची वाट न पाहता नोकरीने आपली वाट पाहायला हवी.तेव्हाच कुठं "आयुष्यावरती बोलू काही..." हे साध्य होईल.

(या ब्लॉग मधील आकडेवारी योजना मासिक- मे 2017 या अंकातील आहे.)
(छायाचित्र सौजन्य-गुगल)
   
   
   
   
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गांधी फेलोशिप प्रवास.....

गांधी फेलोशिप प्रवास..... #भाग1 #gandhifellowship गेटमधून शाळेकडे बघत असताना एका मुलीचा काढलेला फोटो. गांधी फेलोशिपचे कार्य सध्...